Rain Vasai Virar Local Viral Video : मुंबई उपनगरासह वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, काही तासांची विश्रांती घेत ढगफुटीसदृश पाऊस सातत्याने कोसळतोय. याचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) विरार ते चर्चगेट लोकल सेवेला बसला असून गेल्या तीन दिवसांपासून ही जीवनवाहिनी पूर्णपणे कोलमडली आहे.

७ जुलै रोजी पाऊस ओसरल्यानंतर चर्चगेट-विरार सेवा विलंबाने का होईना सुरू झाली खरी, पण पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे काही तासांतच लोकल सेवा पुन्हा ठप्प झाली. परिणामी, सकाळी ऑफिस किंवा इतर कामासाठी मुंबईच्या दिशेने गेलेल्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. लोकल बंद झाल्याने हजारो प्रवासी चर्चगेटहून कशीबशी लोकल पकडून वसई रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले, पण तिथून पुढे विरार आणि नालासोपाऱ्याकडे जाणे प्रवाशांसाठी अशक्य झाले.

…आणि प्रवाशांनी थेट रेल्वे रुळ गाठले! जीव मुठीत धरून थरारक प्रवास

वसई स्थानकाच्या पुढे एकही ट्रेन जात नसल्याचे पाहून हताश झालेल्या प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळांवरून पायी चालण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर याचे धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये संपूर्ण रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याचे दिसत असून पूरसदृश परिस्थितीत, डोक्यावर मुसळधार पाऊस, हातात छत्री आणि पाठीवर बॅग घेऊन लोक कसाबसा आपला जीव सांभाळत ट्रॅकवरून चालत आहेत.

रात्रीचा काळोख पडल्यानंतरही घर गाठण्यासाठी लोक मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रेल्वे रुळांवरून चालत आहेत. एक्स्प्रेस गाड्या धावत असलेल्या या मार्गावरून असा प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. “किमान या एक्स्प्रेस गाड्यांमधून तरी लोकांना विरारपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाने करायला हवी होती,” अशी संतप्त मागणी अडकलेल्या प्रवाशांनी केली.

प्रशासन गायब; घरापर्यंत पोहोचायला मोजावे लागतायत ५०० रुपये!

एकीकडे मुंबई आणि उपनगरात खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना ताज्या असताना, विरारकरांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संकटकाळात रेल्वे प्रशासन किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते प्रवाशांच्या मदतीला धावून आले नाहीत. स्टेशनवर उतरल्यानंतर पूर परिस्थितीमुळे घर गाठण्यासाठी लोकांना ट्रॅक्टरचा आसरा घ्यावा लागत असून, अवघ्या काही अंतरासाठी तब्बल ५०० रुपये मोजावे लागत आहेत. नालासोपारा ते विरार दरम्यान राहणाऱ्या नागरिकांचे सध्या पुरते हाल झाले आहेत.

विरारकरांचा रुळांवरुन जीव मुठीत धरून प्रवास

रात्री १२.१२ वाजता काळोखातून प्रवासी विरारच्या दिशेने जाताना

रेल्वे रुळांवरुन चालताना काका खड्ड्यात पडता पडता वाचले

विरारमधील रेल्वे प्रवाशांवर ओढावलेल्या या स्थितीसाठी जबाबदार कोण?

प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप

या भीषण परिस्थितीवर आता विरार लोकलने प्रवास करणाऱ्या नियमित चाकरमान्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन एसी लोकल (AC Local) सुरू करतंय, पण त्याआधी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. सरकार आणि प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा फटका दरवर्षी सामान्य प्रवाशांनाच का बसावा? असा संतप्त सवाल आता विरारकर विचारत आहेत