दुचाकी म्हटल्यावर चालवणारा आणि त्याच्या मागे बसणारा अशाच दोनच व्यक्तींना वाहतुकीच्या नियमांप्रमाणे प्रवासाला मूभा असते. मात्र अनेकदा भारतामध्ये दुचाकीवरुन तीन किंवा चारजणही प्रवास करताना दिसतात. कधीहीतरी अगदीच दुर्मीळ प्रकारामध्ये पाचजण एका दुचाकीवरुन प्रवास करतानाचेही प्रकार समोर आले आहेत. मात्र मुंबईमधून समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये एक दोन किंवा चार पाच नाही तर तब्बल सहा जण एकाच स्कुटीवरुन प्रवास करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर चक्क सहा तरुण बसल्याचं दिसत आहे. या तरुणांपैकी एकजण तर शेवटी बसलेल्या तरुणाच्या खांद्यावर बसून प्रवास करताना दिसतोय. काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला तरुण हा शेवटी बसलेल्या मुलाच्या खांद्यावर दोन्ही बाजूला दोन पाय टाकून बसल्याचं व्हिडीओथ स्पष्टपणे दिसत आहे. होंडा अ‍ॅक्टीव्हा गाडीवरुन हे सहाजण प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अंधेरी पश्चिमेकडील स्टार बाजारजवळ एका गाडीमधून शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

रमणदीप सिंग होरा नावाच्या व्यक्तीने रविवारी हा व्हिडीओ ट्विटवरुन शेअर केलाय. “फुकरापंतीचा हा कहर आहे. एका स्कुटरवर सहाजण प्रवास करत आहेत,” अशी कॅप्शन या व्हिडीओ रमणदीप यांनी दिलीय. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डललाही या ट्विटमध्ये टॅग केलंय.

या ट्विटवर मुंबई वाहतूक पोलिसांचा ऑटोजनरेटेड रिप्लाय आला असून नेमकं हे कुठे घडलंय असा प्रश्न विचारण्यात आलाय. यावर रमणदीप यांनी अंधेरी पश्चिमेकडील स्टार बाजारजवळ असा रिप्लाय दिलाय. त्यावर वाहतूक पोलिसांनी आम्ही या प्रकरणामध्ये डीएन नगर वाहतूक शाखेला लक्ष घालण्यास सांगितल्याची माहिती दिलीय.

मात्र या प्रकरणामध्ये दोषींवर काही कारवाई करण्यात आली की नाही याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.