Mumbai Rain Funny Viral Video : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईला अचानक पावसाने झोडपून काढले. अचानक वादळी पावसामुळे चाकरमान्यांचे पुरते हाल झाले. वादळी वारं सुटल्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली. अनेक मुंबईकरांनी ही परिस्थिती अनुभवली. सध्या मुंबईतील वादळी वारा अन् पावसातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एकीकडे मुंबईकरांची पावसामुळे लवकर पोहोचण्यासाठी धावाधाव सुरू आहे, तर दुसरीकडे काही मुंबईकर वादळामुळे कोसळलेल्या झाडांची फळं गोळा करण्यात गुंतले आहेत. रस्त्यावर ट्रॅफिक झालं तरी चालेल, पण झाडावरचा एकही नारळ मुंबईकरांनी सोडला नाही, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाहनचालकांची चक्क गाड्या थांबवून नारळ गोळा करण्यासाठी गर्दी
मुंबईत बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झा़डं कोसळल्याची दृश्ये पाहायला मिळाली. व्हिडीओतही पाऊस आणि वाऱ्यामुळे भरहायवेवर नारळाचं भलं मोठ झाडं कोसळलं. यावेळी मुंबईकरांनी झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याऐवजी आधी पडलेल्या झाडावरील नारळ गोळा करण्यास गर्दी केली. अनेक वाहनचालकांनी तर चक्क गाड्या थांबवून नारळ गोळा केले. या घटनेमुळे रस्त्यावर काहीवेळ मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नारळ गोळा करणाऱ्यांना त्याचं काहीच पडलं नव्हतं. यावेळी पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयनेही नारळ गोळा करण्यासाठी गाडी थांबवली. पण, हा व्हिडीओ मुंबईतील नेमका कोणत्या भागातील आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हा व्हिडीओ पाहून मुंबईकर वादळ आलं तरी घाबरले नाही, पण पडलेला नारळ मात्र उचलायचा सोडला नाही.
मुंबईतील हा व्हिडीओ @me_ghatkoparkar नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, बरोबर केलं, ८० रुपये एक नारळ आहे. दुसऱ्याने लिहिले की, चोर तर सर्वांमध्ये दडलेला असतो, पण तो एक संधी शोधत असतो. तिसऱ्याने लिहिले की, झाड लावयला नाही पण त्यावर आलेली फळं गोळा करायला बरोबर सगळे जमले. अनेकांनी हे फारच मजेशीर दृश्य असल्याचे म्हटले आहे.