Sakkubai & Mini Viral Video : मुंबईतल्या प्रत्येक माणसाची स्वतःची एक वेगळी गोष्ट आहे. कधी कधी या गोष्टी फक्त उंच इमारतींमधून नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांच्याही असतात; त्यामुळे नकळत त्या हृदयाला स्पर्श करून जातात. अशीच एक गोष्ट आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. फुलविक्रेती सक्कुबाई आणि तिच्या भटक्या श्वान मिनीच्या अनोख्या नात्याने सगळ्यांना भावूक करून सोडले आहे. दोघांमधील प्रेम, काळजी आणि आपुलकी पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
फुलविक्रेती सक्कुबाई आणि तिची भटकी श्वान मिनी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसते आहे. सक्कुबाई रस्त्यावर फुले विकतात आणि मिनी कायम तिच्या बरोबर असते. श्वान फक्त १५ दिवसांची होती, तेव्हा मिनी फुलविक्रेती सक्कुबाईच्या आयुष्यात आली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून, मिनी तिच्याबरोबर राहिली आहे आणि रस्त्यावर फुले विकताना रात्री उशिरापर्यंत तिची साथ दिली. हा साधा आणि नैसर्गिक व्हिडीओ लवकरच हजारो लोकांनी पाहिला, आणि प्रेक्षक त्यांच्या नात्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले.
परिस्थिती नात्यांची किंमत ठरवत नाही (Viral Video)
सक्कुबाईने फुले विकण्यासाठी जबरदस्त स्टॉल आणि मिनीसाठी घर देखील बनवून घेतले आहे. दोन फळींच्या मधोमध ही श्वान मिनी बसलेली असते आणि वरच्या फळीवर फुले विकण्याचे काम सुरु आहे. मग सक्कुबाईने मुलगी मंजुबाईची ओळख करून दिली. मंजुबाईने मिनीची किती काळजी घेतली जाते, याबद्दल माहिती दिली. मिनीला नियमित दूध, चिकन देणे, तिला घरी घेऊन जाणे आणि तिचे लसीकरणही करून घेते. याशिवाय, एका मनमिळावू डॉक्टरांनी मिनीच्या तब्येतीसाठी जवळपास ३ हजार रुपयांची औषधं मोफत सुद्धा दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
या सगळ्या गोष्टींमधून सक्कुबाईचं मिनीवरचं निस्वार्थ प्रेम आणि माणुसकीचं दर्शन घडते आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @adityasurroy
या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “सक्कुबाईंनी जे आयुष्यातून समजून घेतलं आहे, ते एसीखाली बसून उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना कधीच कळणार नाही. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते, नात्यांची किंमत परिस्थिती ठरवत नाही, आणि प्रेमासाठी ऐश्वर्य लागत नाही”, “मिनीचे घर खूप सुंदर आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…

