Mumbai Viral Post : मुंबई हे जगातील सर्वांत दाटावाटीचे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. या शहरात अनेक लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. या सर्वांत मोठ्या शहराचे नियोजन मुंबई महापालिकेकडून केले जाते. त्यात घरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे कामही महापालिकेमार्फत होत आहे. दरम्यान, मुंबईतील अस्वच्छतेबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्याच मुंबईतील नागरिकांनो, महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी किती शुद्ध हे तुम्ही कधी तपासले आहे का? नसेल तर ही एक व्हायरल पोस्ट पाहा. मुंबईकरांनो, तुम्हाला नळाद्वारे येणारं पिण्याचं पाणी किती शुद्ध? एका मुंबईकर तरुणाने आपल्या घरातील नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची चाचणी केली. त्यावेळी हे पाणी आरओ वॉटरच्या बरोबरीचे असल्याचा निकाल समोर आला. या निकालाने मुंबईकरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे व्हायरल झालेल्या पोस्टवर आता लोक जोरदार कमेंट्स करीत आहेत. एका तरुणाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला; ज्यात त्याने मुंबईत लोकांना नळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची चाचणी केली असल्याचे सांगितले. फोटोमध्ये व्यक्तीने हातात वॉटर टेस्टर धरला आहे, जो १९० पीपीएम (पार्ट्स प्रति दशलक्ष) असा रिझल्ट दर्शवीत आहे. तरुणाने अशा प्रकारे मुंबईतील महापालिकेच्या पाण्याची गुणवत्ता तपासली; जी आरओ/यूव्ही फिल्टरशिवाय टीडीएसवर ६१ पीपीएम होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, या पाण्याची गुणवत्ता ही जगातील नळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्वांत स्वच्छ पाण्यापैकी एक अशी आहे. Read More News On Trending : ट्रेन रुळावरून घसरली अन् थेट घुसली शेतात; अपघाताच्या थरारक घटनेचा Video नेमका कुठला? वाचा सत्य घटना… या निकालामुळे मुंबईकरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही पोस्ट @marinebharat नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये लोक त्यांच्या भागातील पाण्याच्या दर्जाबाबतही आपले मत मांडत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, मुंबईचे व्यवस्थापन (महानगरपालिका) कदाचित जगातील सर्वोत्तम व्यवस्थापनांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची काळजी घेणे हा काही विनोद नाही. आणखी एका युजरने लिहिले आहे की, वसई-विरारमध्ये कधी कधी ते ३७५ पीपीएमपर्यंत जाते. दुसऱ्याने म्हटले आहे की, राहण्यासाठी सर्वांत वाईट ठिकाणांपैकी एक. तिसऱ्याने म्हटलेय की, पाण्याची गुणवत्ता. कमेंट्समध्ये लोक आपापल्या भागातील पाण्याच्या गुणवत्तेविषयीचे मत मांडताना दिसत आहेत.