Mumbaikars Que Up To Get In The Train At Badlapur Station: मुंबईच्या लोकल ट्रेनला अनेकदा या शहराची लाइफलाईन मानलं जातं. त्या वेगवान, गर्दीने गच्च असतातच. ऑफिसला जाताना येताना प्रवाशांची सीट पकडण्यासाठी धावपळ करण्यापासून ते ट्रेन पूर्णपणे थांबवण्यापूर्वी उड्या मारणाऱ्या आणि उतरणाऱ्या लोकांपर्यंत दररोजचा प्रवास हा खूपच भयंकर असतो. म्हणूनच अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क याच्या अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळते.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये लोकल ट्रेनमधल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात सर्व पुरूष अगदी शिस्तीत ट्रेन थांबल्यावर आणि तेही रांगेत चढताना दिसत आहेत. दरवाजाजवळ नेहमीच्या गर्दीऐवजी प्रवासी स्टेशनवर ट्रेन आल्यावर धीराने चढण्यासाठी त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत पुढे सरकत आहेत. गर्दी असलेल्या डब्यांसाठी आणि दरवाजाजवळ उभे राहण्यासाठी जागा नसलेल्या शहरासाठी शिस्तीचे हे उदाहरण जवळपास अशक्य समजले जात आहे.

हा एक लोकलचा व्हिडीओ व्हायरल झाला तो कुठल्याही स्टंट किंवा सेलिब्रिटीमुळे नाही तर रोज कामावर जाणाऱ्या लोकल प्रवाशांच्या शिस्तीमुळे. यामध्ये एक मुलभूत नागरी जाणीव दिसून येते. लोक शांतपणे रांगेत उभे असल्याचे दृश्य यामध्ये दिसते. हे मुंबई लोकलच्या स्टिरियोटाइपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात होते. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणारे थांबतात, रिवाइंड करतात आणि पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी चक्क हे खोटं असल्याचं आणि हा व्हिडीओ एआय व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी तर या व्हिडीओमध्ये जे दाखवलं आहे त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे असं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “खरंच हा व्हिडीओ मुंबईतला आहे का.” तर दुसऱ्याने म्हटले आहे की, “हा एआय व्हिडीओ आहे.”म्हणजेच गर्दीच्या वेळी लोकल प्रवासी एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीत चढतो यावर विश्वास ठेवणं कठीण आहे असं लोकांचं म्हणणं आहे.

यावर महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास यावरही वादविवाद होतात. अनेकांनी या शिस्तीचे कौतुक केले अशले तरी व्हिडीओमुळे ट्रेनमधील श्रेणीवर आधारित प्रवासाच्या सवयींबद्दलही कमेंट केल्या आहेत. अनेक युजर्सनी असे म्हटले की, “अशी सुव्यवस्था फर्स्ट क्लासच्या डब्यांपुरतीच मर्यादित आहे.” दुसऱ्या युजरने म्हटले की, “हे फर्स्ट क्लास प्रवासीच करू शकतात, सेकंड क्लासवाले अशी रांग फॉलो करणारच नाही.”