Ganeshotsav 2023 Aanandacha Shidha: अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट होणाऱ्या आणि केशरी, पिवळय़ा रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, तसेच दिवाळीसाठी १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा उपक्रम राज्य सरकारने राबवला आहे. यापूर्वी सुद्धा दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा महत्त्वाच्या प्रसंगी यापूर्वी सुद्धा आनंदाचा शिधा वाटण्यात आला होता. मात्र आता गणेशोत्सवाच्या वेळी वाटण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा उपक्रमातील एका गोष्टीवर एका मुस्लिम व्यक्तीने आक्षेप घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमाच्या पिशव्यांवर छापल्या गेलेल्या गणपतीच्या फोटोवर एका मुस्लिम बांधवाने आक्षेप घेतला आहे. गोवंडीतील मोहसीन अन्सारी यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. आनंदाचा शिधा वाटल्यावर, वापरानंतर या पिशवीचं काय केलं जाणार? अशाप्रकरे गणपतीच्या फोटोचा अपमान करु नये, अशी विनंती मोहसीन यांचा या व्हिडीओतून केली आहे. तसंच शिधा घेतल्यानंतर पिशवी दुकानदाराला परत करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.




अन्सारी म्हणतात की, “या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचेही फोटो आहेत. त्यांची मला पर्वा नाही पण या फोटोतील व्यक्तींनी गणपतीचा फोटो असलेल्या पिशवीचं पुढे काय होणार याचा विचार करावा, थोड्या दिवसांनी जर गणेशाच्या फोटोची पिशवी रस्त्यावर किंवा कचराकुंडीत टाकलेली असेल, सध्याचे जे वातावरण आहे त्यात हे खूप चुकीचं ठरेल. तुम्ही दोन चार किलो रेशन घेण्यासाठी तुमचे इमान विकू नका. या पिशव्या नीट जतन करून ठेवा किंवा रेशन दुकानात परत नेऊन द्या.”
हे ही वाचा<< ‘ती’ ने असं काही वेड लावलं की स्कॅमर शेवटी भडकून शिव्याच देऊ लागला; Video पाहून तुम्हीही शिकून घ्या
दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून अन्सारी यांचे कौतुक केले आहे. अशा मुस्लिम बांधवांमुळेच धर्मनिरपेक्षतेवरील विश्वास वाढत आहे. अत्यंत सुंदर मेसेज आहे अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर आहेत.