आपल्या आसपास अशा अनेक मुली आहेत ज्यांना शिकण्याची खूप इच्छा असते. मात्र, घरच्यां लोकांनी लग्न करण्याची जबरदस्त केल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं, याबाबच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. पण सध्या एका मुलीची अशी बातमी व्हायरल होत आहे. जी वाचून तुम्हालाही तिचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण, बिहारमधील एका मुलीनी घरच्यांनी लग्नासाठी जबरदस्ती करताच घरातून पळ काढला आणि ती थेट दिल्ली पोलिसांमध्ये भरती झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोचहा पोलिस स्टेशनमध्ये ५ वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पाच वर्षानंतर पोलिसांना ती बेपत्ता मुलगी ज्या अवस्थेत सापडली ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, ज्या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. ती मुलगी कुठेही गायब झाली नव्हती तर ती दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही पाहा – दोन मांजरींचा बाईकवरील प्रवासाचा Video होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतायत ‘विश्वास आणि प्रेम…’
या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी रामा शंकर यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, ‘ही मुलगी २०१८ मध्ये बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता.’ दरम्यान, बिहार पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला असता ती दिल्ली पोलिसात हवालदार असल्याचे त्यांना कळाले. शिवाय सध्या या मुलीचे प्रशिक्षण सुरू असून पोलिस तिचा जबाब नोंदवणार आहेत. तर मुलीने या पाच वर्षात कुटुंबीयांशी संपर्क का केला नाही? याबाबतची माहिती मुलीच्या जबाबानंतरच समजणार आहे.
शिक्षणासाठी पळाली मुलगी –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मुलीच्या आई-वडिलांना तिचे लग्न लावून द्याचे होते. पण मुलीला अभ्यास करुन अधिकारी बनायचं होते. त्यामुळे ही मुलगी कुणालाही काहीही न सांगता थेट दिल्लीला पळून गेली. तिथे तिने शिक्षण घेतले आणि सध्या ती दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत झाली आहे. दरम्यान, वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळे तिची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून शिक्षणासाठी या मुलीने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.