ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एका लग्नात नागाला नाचवणं चांगलंच महागात पडलं. करंजिया शहरातील लग्नात सहभागी झालेल्या लोकांनी टोपलीत जिवंत कोब्रा साप ठेवला होता आणि सापासमोर नाचत होते, या व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे; या घटनेचा व्हिडीओ गुरुवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ‘नागिन’ गाण्याच्या तालावर वऱ्हाडी नाचताना दिसत आहेत. या वरातीत एका सर्पमित्राने साप आणला होता. या सर्पमित्राला ब्रिजग्रूमच्या कुटुंबाने लग्न समारंभासाठी आमंत्रित केले होते. ही घटना पाहून स्थानिक नागरिक घाबरले आणि त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सापाची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, सर्पमित्र आणि चार-बँड पथकातील लोकं अशा एकूण पाच जणांना जिवंत सापाचा व्यावसायिक म्हणून वापर तसेच त्याला त्रास दिल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. करंजिया वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी श्रीकांत नाईक यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी एका स्थानिक रहिवाशाकडून मिरवणुकीत एक व्यक्ती सापासोबत नाचत असल्याची व्हिडिओ क्लिप त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्याला रंगेहात पकडले. मात्र, त्यावेळी बँड पार्टीचा मालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

Video: उष्णतेची लाट पाहता ‘देशी जुगाड’, नवरा वऱ्हाड्यांना मंडपासोबत घेऊन गेला नवरीकडे

अधिकाऱ्याने सांगितले की, या आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) कलम ९, १२, ८० आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअंतर्गत तीन वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, याप्रकरणी इतरांवर गुन्हा दाखल करावा, असे मत वन्यजीव तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. खुर्डा जिल्ह्याचे मानद वन्यजीव वॉर्डन शुभेंदू मलिक म्हणाले, ज्या लोकांनी समारंभात सर्पमित्रांना बोलावले, त्यांना कलम ५२ अंतर्गत गुन्हा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अटक करण्यात यावी.