Nagpur Auto Driver Beaten Up: कोलकातामधील आर.जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर बदलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी महिला, मुलींवरील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत गेल्या. या घटनांमुळे जनतेमध्ये मोठा असंतोष पसरलेला असतानाच नागपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने दोन शालेय विद्यार्थीनींना कोलकातामधील बलात्कार प्रकरणाचा दाखला देऊन धमकावविले. त्यानंतर भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड करून रिक्षा चालकाचा प्रताप उघडकीस आणला. त्यानंतर जमलेल्या लोकांनी रिक्षचालकाला अद्दल घडविली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नागपूरमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक आणि सदर मुलींमध्ये वाद झाला होता. मुली मोठ्या आवाजात गप्पा मारत असल्यामुळे रिक्षा चालक संतापला आणि त्याने त्यांना गप्प बसण्यास सांगितले. मात्र मुलींनी त्यास उत्तर दिल्यानंतर रिक्षा चालकाने कोलकातामधील बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत तुमच्याही बरोबर तसेच कृत्य करेन, अशी धमकी दिली.

हे वाचा >> Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

रिक्षा चालकाची धमकी ऐकून भेदरलेल्या मुलींनी त्याला रिक्षा तिथेच थांबविण्यास सांगितले आणि बाहेर येऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार बघून प्रत्यक्षदर्शींनीही त्याठिकाणी गर्दी केली. जमलेल्या लोकांनी मुलींकडून वादाची पार्श्वभूमी जाणून घेतली आणि त्यानंतर लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

रस्त्यावर जमलेल्या लोकांनी रिक्षाचालकाला बाजूला नेऊन जबर मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक एका दुकानाच्या कोपऱ्यात बसलेला दिसत असून काही तरूण त्याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर काही लोकांनी पीडित मुलीला पुढे करून तिनेच याला शिक्षा द्यावी, असे सांगितले. त्यानंतर मुलगी रिक्षाचालकाला मारहाण करते.

हे ही वाचा >> Chandigarh : संतापजनक! कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक

सदर घटना नागपूरच्या पार्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे बोलले जाते. मंगळवारी (२० ऑगस्ट) सदर घटना घडली असून शुक्रवारी (२३ ऑगस्ट) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पार्डी पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.