सुटीचा वार म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या तोंडावर नकळत रविवार येतो. शाळेत जाणारे विद्यार्थी असोत नाहीतर नोकरदार सगळेच या रविवारची म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या आतुरतेने वाट पाहत असतात. आठवडाभराची कामे, आराम, फिरायला जाणे, खरेदी, चित्रपट पाहणे, मित्रमंडळींना भेटणे असे एक ना अनेक प्लॅन या दिवशी ठरतात. तर आता सुटीचा वार रविवारच का? तो कोणी ठरवला? आणि मागच्या किती वर्षांपासून आपल्या देशात रविवारची सुट्टी मिळते? तर जाणून घेऊयात रविवारच्या सुटीमागची खरी कथा…
भारतीयांना रविवारची पहिली साप्ताहिक सुट्टी मिळाली होती ती १० जून १८९० रोजी. देश त्यावेळी पारतंत्र्यात होता, त्यामुळे ही सुटी कोण्या इंग्रज साहेबाने दिली असे आपल्याला वाटेल. मात्र तसे नसून नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाच्या प्रयत्नाने भारतीयांना ही सुटी मिळू लागली. यासाठी नारायण लोखंडे यांना तब्बल सहा वर्षाचा संघर्ष करावा लागला. १८८१मध्ये भारतात फॅक्टरी अँक्ट लागू झाला. या कायद्याने बालकामगारांचे किमान वय, आठवड्याच्या सुटीची तरतूद केली. मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती. याविरोधात पहिला आवाज उठवला तो नारायण मेघाजी लोखंडे यांनी. १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला.




फुलमाळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. पुण्याच्या सासवडजवळील कन्हेरसर हे त्यांचे मूळ गाव. सुरुवातीला रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दिवसातील १३-१४ तास काम करणारे कामगार दिसले. त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे. ही परिस्थिती पाहून अस्वस्थ झालेल्या लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्यांनी बॉम्बे मिल हँडस असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना १९९० मध्ये स्थापन केली. भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात करणारी संघटना म्हणून ही संघटना ओळखली जाते. १९ व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.