चंद्रावर सावलीमुळे NASA च्या ऑर्बिटरला विक्रम लँडरचे फोटो मिळाले नाही?

चंद्रावर आता कातरवेळ सुरु आहे. अंधार पडण्याआधीची जी वेळ असते तशी स्थिती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रमच्या लँडिंग साइटच्या जागेचे फोटो काढले आहेत. पण त्यातूनही अजून नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही. चंद्रावर रात्र सुरु होण्याआधी नासाच्या ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या फोटोंमुळे विक्रम लँडरबद्दल नेमकी माहिती मिळेल अशी भारतीयांना अपेक्षा होती. लँडर ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये नसल्यामुळे हे घडले असावे असे नासाने म्हटले आहे.

नासाचा ऑर्बिटर मागच्या १० वर्षांपासून चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे. मंगळवारी हा ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइट जवळून गेला. चंद्रावर विक्रम लँडरकडून ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते. त्या जागेचे फोटो ऑर्बिटरने काढले आहेत. पण लँडरचा नेमका फोटो मिळालेला नाहीय १७ सप्टेंबरला ऑर्बिटरने चंद्रावरील लँडिंग साइटच्या जागेचे जे फोटो काढले आहेत ते त्याच साइटवरील आधीच्या फोटोंबरोबर जुळवून पाहिले जातील. नासाची एलआरओसीची टीम या सर्व फोटोंचे विश्लेषण करेल. त्यातून येणारा निष्कर्ष सार्वजनिक केला जाईल.

७ सप्टेंबरला विक्रमने चंद्रावर ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते. तिथे आता कातरवेळ सुरु आहे. अंधार पडण्याआधीची जी वेळ असते तशी स्थिती आहे. सूर्य मावळतीची वेळ असल्याने मोठया सावल्या तयार होतात. ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला त्यावेळी तिथे कातरवेळ होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोठा भाग हा सावल्यांनी व्यापलेला होता. लँडर त्यावेळी सावलीखाली झाकला गेला असावा असे जोशुआ ए हँडल यांनी सांगितले. ते नासाच्या प्लॅनेटरी सायन्स विभागाचे अधिकारी आहेत.

ऑर्बिटरला या उड्डाणामध्ये लँडर सापडण्याची शक्यता खूप धुसर होती याच्याशी तज्ञ सुद्धा सहमत आहेत. सूर्य मावळतीकडे असल्याने स्पष्ट फोटो मिळण्याची शक्यता कमी होती. लँडर जर चंद्रावरील उंचवटयाच्याजवळ असेल तर तो सावलीखाली झाकला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या उड्डाणाच्यावेळी ऑर्बिटरला लँडरचे अधिक चांगले फोटो मिळू शकतात असे अवकाश विषयाचे तज्ञ जतन मेहता यांनी सांगितले. सात सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी अंतरावर असताना लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला.

नासाचा ऑर्बिटर आता त्याच भागातून पुन्हा १४ ऑक्टोंबरला जाणार आहे. त्यावेळी फोटो काढण्यासाठी अनुकूल वेळ असेल. चंद्रावर २१ सप्टेंबरपासून रात्र सुरु होणार असून त्यावेळी -१८० डिग्रीचे तापमान असेल. त्यावेळी संपर्क साधणे अशक्य आहे. लँडर आणि रोव्हरची रचनाच १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nasa orbiter not able to take clear photo of vikram lander on moon dmp

ताज्या बातम्या