आधुनिक युगात अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. मानवाची अंतराळातील झेप त्याचं एक उदाहरण आहे. स्पेस स्टेशनवरील सततचे प्रयोग मानवी विकासाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सामन्यांमध्ये अंतराळत घडणाऱ्या घडामोडींचं कायमच कौतुक आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांचे केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलेल्या अंतराळवीरांचे केस कापल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने SpaceX क्रू-3 मिशनद्वारे चार अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले आहे. त्यात भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी यांचाही समावेश आहे.

अंतराळवीर मॅथियास मौररने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात स्पेस स्टेशनवर क्रू सोबत्याकडून केस कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मौरर गुडघे टेकून अंतराळ यानाला पकडून आहेत. तर सहकारी राजाचारी खास ट्रिमर वापरून त्यांचे केस कापत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी मजेशीर कमेंट्स ही लिहिली आहे. त्यात त्यांनी राजाचारी यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे. “स्पेसमधील सलूनमध्ये या, जिथे (राजा चारी) नावाचा प्रतिभावंत व्यक्ती आहे. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यात केस जाईल याची भीती असेल तर काळजी करू नका. स्पेस स्टेशनवर या. ट्रिमरमध्ये वॅक्यूम क्लिनर जोडलं आहे. स्पेस स्टायलिस्ट सेवेसाठी माझ्याकडून पाच स्टार”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

मौररने अंतराळात केस कापण्याशी संबंधित भीतीबद्दल सांगितले की, “जर आपल्या केसांचा एक छोटा कण किंवा तुकडा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या हार्डवेअरमध्ये गेला तर तो इलेक्ट्रिकपासून लाईफ सपोर्ट सिस्टमपर्यंत सर्वकाही खराब करू शकतो. त्यामुळे अंतराळवीरांना अंतराळात केस कापण्याची परवानगी नाही.”सोशल मीडियावर हा व्हिडीओ आल्यानंतर यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत.या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्स सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याआधी स्पेस स्टेशनवरील ‘फ्लोटिंग पिझ्झा पार्टी’ आणि अंतराळवीरांचे वर्कआउट व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.