“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा… नवाब मलिक झेरॉक्स सेंटर”

भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ट्विटरवरुन साधला निशाणा

nawab malik
भाजपा नेत्याने साधला मलिकांवर निशाणा (फाइल फोटो सौजन्य पीटीआय)

क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून केल्या जात असलेल्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपासून अनेकदा शंका उपस्थित केलीय. वानखेडेंनी फसवणूक करुन इंडियन रेव्हेन्यू सर्विसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आपल्या दाव्याला पाठबळ देण्यासाठी मलिक हे मागील काही दिवसांपासून वानखेडेंसंदर्भातील कागदपत्रं सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत आहेत. मात्र आता यावरुनच भाजपाच्या एका नेत्याने नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांच्या या कागदोपत्री दाव्यांवरुन त्यांना, ‘नवाब मलिक झेरॉक्स सेंटर’ असं म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्या जन्माचा कथित दाखला ट्विटरवरुन शेअर केला होता. यामध्ये समीर यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दिसत होतं. यावरुन मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून खोटी कागदपत्रं सादर करुन नोकरी मिळवल्याचा आरोप केला.

२७ ऑक्टोबर रोजी मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा ट्विटरवरुन शेअर करत मुस्लीम पद्धतीने समीर यांनी पहिलं लग्न केल्याचा दावा करत ते मुस्लीम असल्याचा आपला दावा योग्य असल्याचं म्हटलं. यावरुन समीर, त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मागील आठवडाभरापासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. समीर यांचे वडील, पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडे यांनीही आपली बाजू मांडताना मलिक यांचे आरोप खोडून काढलेत.

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरु असलेल्या या वानखेडे विरुद्ध मलिक वादावरुन सोशल नेटवर्किंगवरुन उपहासात्मक आणि कठोर शब्दांत टिका होतानाही पाहयाला मिळत असतानाच भाजपाचे आमदार आणि भाजपा युवा मोर्चेचा राष्टीय उपाध्यक्ष राम सातपुते यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. “कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा. काहीही पुरावे नसतील तरी काढून मिळतील.. नवाब मलिक झेरॉक्स सेंटर”, असं ट्विट सातपुते यांनी केलं आहे. हा मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून तोच शेअर करत सातपुतेंनी मलिकांवर निशाणा साधलाय.

दरम्यान, मलिक यांनी या पुढेही वेळोवेळी आपण समीर वानखेडेंनी केलेल्या फसवणुकीसंदर्भातील कागदपत्रं समोर आणू असं म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: National vice president of bjym ram satpute slams nawab malik over sameer wankhede case scsg

ताज्या बातम्या