Navratri Garba Video 2022: नवरात्री आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. नवरात्रीचा जल्लोष, उत्साह व धामधूम देशभरात पाहायला मिळत आहे. करोनानंतर यंदा पहिल्यांदाच गरब्याचे आयोजनही होणार आहे त्यामुळे अनेक गरबाप्रेमींनी अगोदरच ऑनलाईन शिकवण्या घ्यायलाही सुरुवात केली आहे. भुलेश्वर, कुलाबा येथील दागिन्यांच्या बाजारात, चनिया-चोळी विक्रेत्यांच्या दुकानात हौशी ग्राहकांची गर्दी दिसतेय. एकूणच काय तर यंदा नवरात्रीत धम्माल येणार हे निश्चित आहे. पण इथे मुंबईकर अजून तयारीतच व्यस्थ असताना तिथे राजस्थानात गरबा कार्यक्रमांना अगोदरच सुरुवात झाल्याचे दिसतेय. गरबाही असा साधासुधा नाही बरं का तर चक्क स्विमिंग पूल मध्ये गरबा आयोजन करण्यात आले आहे.
स्विमिंग पूलमधील गरब्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे स्विमिंग पूलमध्ये उतरून एक गट गरबा खेळताना दिसत आहे. पारंपरिक चनिया चोळी व केडीयू घालून यात महिला व पुरुष दोघेही भन्नाट स्टेप करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.
पाहा स्विमिंग पूल गरबा
दरम्यान, राजस्थान, गुजरात या राज्यात नवरात्रीचा उत्साह जोरदार असतो, मुंबईतही फाल्गुनी पाठक यांच्या गरबा नाईट्ससाठी हौशी कलाकार आधीपासून तिकीट खरेदी करून ठेवतात. अनेक राजकीय पक्षांकडूनही शहरात ठिकठिकाणी गरबा आयोजन केले जाते. यंदा गरबा नाईट्स गाजवण्यासाठी तुमची तयारी झाली आहे ना?