Viral Video: शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची विधिवत पूजा केली जाते. पुढील नऊ दिवस भक्तिभावाने उपवास, पूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी केले जातात. दहाव्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमीचा सण साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे.
देवी दुर्गेला सोळा शृंगार प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात अनेक महिला श्रद्धेने देवीची ओटी भरतात आणि तिला शृंगाराच्या वस्तू अर्पण करतात. यामध्ये कुंकू, हळद, बांगड्या, हिरव्या बांगड्या, काजळ, मेहंदी, फुलं, गजरा, साडी, खण, नारळ आणि सुपारी अशा विविध वस्तूंचा समावेश केला जातो. देवीला या वस्तू अर्पण करून महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. विशेषतः शारदीय नवरात्रीमध्ये देवीची पूजा, ओटी भरणे आणि शृंगार अर्पण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या परंपरेतून देवीप्रती असलेली श्रद्धा, भक्तिभाव आणि आदर व्यक्त केला जातो.
सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हिडीओची चर्चा रंगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मेकअप आर्टिस्ट देवीच्या मूर्तीला नारंगी रंगांची सुंदर साडी नेसवून आकर्षक दागिने आणि फुलांचे गजरे घालून सजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तो देवीला अगदी पायाच्या नखांपासून ते डोक्यावरील केसांपर्यंत बारकाईने शृंगार करताना दिसतोय. येणाऱ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीने देवीला सजवून तिचे सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न या तरुणाकडून अशाच प्रकारे केला जाईल. त्याची ही कलाकुसर आणि देवीप्रती असलेली भक्ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमधून मेकअप आर्टिस्टची कला आणि देवीच्या शृंगाराविषयी असलेली त्याची आस्था पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ:
A post shared by ♛?????? ????-?? & ???? ??????♛ (@viraj_patil_makeup_and_hair)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @viraj_patil_makeup_and_hair
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आज नवरात्रीचा पहिला दिवस, आम्ही सकाळपासून व्हिडीओची वाट पाहत होतो.” एका युजरने लिहिलेय, “कलाकाराच्या कलेला सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर भावा”
