लग्न म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न येतो आपल्या भावी जोडीदारासोबत आपल्या आवडी-निवडी, पसंत-नापसंत, विचार जुळतील की नाही याचा. बऱ्याचदा अशा पद्धतीच्या विवाहामध्ये मुला-मुलींना अगदी थोडा वेळ दिला जातो आणि नंतर त्यांना विचारले जाते की तुमचा भावी जोडीदार तुम्हाला आवडला की नाही. कपड्यावरील अॅक्सेसरीज निवडण्यासाठी देखील आपण जास्त वेळ घेतो परंतु त्यापेक्षा कमी वेळेत जोडीदार निवडण्याचे प्रेशर कुटुंबातील व्यक्तीकडून टाकले जाते.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकलेल्या नाझरीन फझलने एक नवा मार्ग दाखवला आहे ज्याची दखल अनेकांनी घेतली असून आपण देखील असाच मार्ग अवलंबणार असल्याची तिला खूप लोकांनी म्हटले आहे.
जेव्हा नाझरीन आणि तिच्या भावी जोडीदाराची भेट घडवून आणण्यात आली तेव्हा त्यांनी काही वेळ सोबत घालवला. त्यावेळात तिने तिच्या भावी जोडीदाराचा इमेल आयडी घेतला.
त्याच्या इमेल आयडीवर तिने दोन पानी पत्र लिहिले. त्यामध्ये तिने एक पान स्वतःबद्दल लिहिले आणि दुसरे पान तिला तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबद्दल लिहिले. त्यानंतर दोघांनी एकेमकांना तब्बल ८० इमेल केले. या इमेल्सला कुणीही रोमॅंटिक इमेल म्हणू शकणार नाही असे नाझरीन म्हणते. केवळ मला माझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत आणि त्याला काय माझ्याकडून अपेक्षा आहेत. आमचे स्वभाव कसे आहेत, आवडी-निवडी कशा आहेत. आयुष्याचे प्राधान्यक्रम काय आहेत याबाबतचे आमचे विचार आम्ही एकमेकांसमोर इमेल्सच्या माध्यमातून मांडत गेलो असे तिने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
लग्नानंतर मुलीने नोकरी करावी की नाही याबाबत तुझे काय विचार आहेत? पिळवणूक म्हणजे काय? तुला मुले केव्हा हवी आहेत? अशा खूप साऱ्या प्रश्नांचा तिने त्याच्यावर भडीमार केला. त्याने देखील तिच्या सर्व प्रश्नांना अत्यंत संयमाने उत्तरे दिली. तिच्याशी लग्न करायचे की नाही याबाबतचा निर्णय त्याने तिचा पहिला इमेल वाचूनच घेतला होता. परंतु, अद्याप तिचा निर्णय बाकी होता म्हणून त्याने शांततेने वाट पाहत तिच्या सर्व शंकाचे निरसन केले. जेव्हा तिला वाटले की हा सुयोग्य जोडीदार आहे तेव्हाच तिने त्याला होकार दिला.
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर मेनूकार्डकडे पाहत हजारो तास घालवतो आणि शेवटी बटर चिकन आणि नान ऑर्डर करतो परंतु जेव्हा जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा काही मिनिटांमध्ये का निर्णय द्यावा लागतो असे तिने विचारले. आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी तिने निवडलेली पद्धत योग्य असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तिच्या फेसबुक पोस्टला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. ती आता लग्न करुन सौदी अरेबियाला गेली आहे.