अदानी समूहातील तीन कंपन्यांनी मंगळवारी ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणानंतर आता आणखी २६ टक्के हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानंतर सर्वाधिक चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे आपल्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे एनडीटीव्हीचे नावाजलेले पत्रकार रवीश कुमार. अदानी समूह या वृत्तवाहिनीमध्ये काही टक्के हिस्सा ताब्यात घेण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर रवीश यांच्या राजीनाम्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगू लगाली. यावर रवीश यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलंय काय?
एएमजी मीडिया नेटवर्क्‍स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडसह विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी एनडीटीव्हीचे प्रत्येकी ४ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १.६७ कोटी भागभांडवली समभागांच्या अधिग्रहणासाठी प्रति समभाग २९४ रुपयांची किंमत देऊ केली आहे. एनडीटीव्हीच्या विद्यमान भागधारकांना उद्देशून आलेल्या या खुल्या प्रस्तावाची जेएम फायनान्शियल लिमिटेडद्वारे घोषणा झाली. अधिग्रहणकर्त्यांच्या वतीने या समभाग खरेदीचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियलकडून पाहिले जात आहे.

रवीश कुमार चर्चेत
केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारविरोधात सातत्याने टीका करणारे आणि आपल्या वेगळ्या तसेच उठून दिसणाऱ्या भूमिकांमुळे चर्चेत असणारे रवीश कुमार हे या अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देतील अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. एनडीटीव्हीबरोबरच अदानी आणि रवीश कुमार यांचं नावही सोशल मीडियावरील ट्रेण्ड्समध्ये आघाडीवर होतं. सत्ताकेंद्राच्या निकटवर्तियांपैकी एक असणारे अशी सातत्याने विरोधी पक्षांकडून टीका होणाऱ्या अदानी समूहाकडे वृत्तवाहिनीच्या मालकीचा काही हिस्सा जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर रवीश कुमार राजीनामा देणार की काय अशी चर्चा सुरु झाली. अनेकदा केंद्रामधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका करणाऱ्या रवीश कुमार या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय करणार याबद्दल सोशल मीडियावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लगाले. अशातच दुसऱ्याच दिवशी रवीश यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

रवीश काय म्हणाले?
रवीश कुमार यांनी अगदी खोचक पद्धतीने त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांबद्दल ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे. “माननीय जनता, पंतप्रधान नरेंद्र मोदी मला मुलाखत देण्याची जशी अफवा उठली होती तशीच सध्या माझ्या राजीनाम्याची अफवा पसरली आहे. मोदी मला मुलाखत देण्यासाठी तयार झाले असून अक्षय कुमार माझ्या घराच्या दाराशी आंबे घेऊन वाट पाहत असल्याची अफवा उठली होती तसाच हा प्रकार आहे,” असा टोला रवीश कुमार यांनी लगावला आहे. “तुमचा रवीश कुमार, जगातील पहिला सर्वात महागडा शून्य टीआरपी असणारा वृत्तनिवेदक आहे,” असंही त्यांनी ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे. रवीश यांनी हे ट्वीट आपल्या प्रोफाइलवर पीन टू टॉप करुन ठेवलं आहे. म्हणजेच त्यांच्या प्रोफाइलवर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या नव्या ट्वीटऐवजी हेच ट्वीट आधी दिसेल.

अदानी अधिग्रहण करण्याच्या चर्चेमुळे चॅनेलला फायदा
अदानी समूहाकडून अधिग्रहण केले जाण्याच्या चर्चेमुळे एनडीटीव्हीच्या समभागाचे मूल्य गत महिनाभरात २५२.५० (२७ जुलै) पातळीवरून तब्बल ३८ टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारच्या व्यवहारातही बीएसईवर समभाग २.६१ टक्के वाढून ३६६.२० रुपयांवर स्थिरावला.

निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (व्हीसीपीएल) या एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ला कर्ज देणाऱ्या आणि आता अदानी समूहाचा घटक असलेल्या कंपनीला, न फेडलेल्या कर्ज रकमेचे समभागांमध्ये रूपांतरणासह एनडीटीव्हीत २९.१८ टक्के हिस्सेदारी मिळविण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून मंजुरीची मोहोर मिळविणे आवश्यक ठरेल, असा दावा एनडीटीव्हीने गुरुवारी केला. तो जर मान्य झाल्यास अधिग्रहणकर्त्यां अदानी समूहाच्या माध्यम क्षेत्रात विस्ताराच्या मनसुब्यांना मूर्तरूप मिळणे यातून लांबणीवर टाकले जाऊ शकते.

एनडीटीव्हीने काय म्हटलं?
याच कर्जप्रकरणाच्या संबंधाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी ‘सेबी’ने आदेश देताना एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांना भांडवली बाजारातील प्रवेशाला प्रतिबंधित करताना, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समभाग खरेदी, विक्री किंवा अन्य व्यवहारांस दोन वर्षांच्या कालावधीसाठी मज्जाव केला होता. या प्रतिबंध आदेशाची मुदत २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत आहे, असे एनडीटीव्हीने शेअर बाजाराला दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.

अदानी दावा करु शकत नाही
ही प्रलंबित कार्यवाही आणि त्या संबंधाने अपिलाची प्रक्रिया जोवर पूर्ण होत नाही, तोवर अधिग्रहणकर्त्यां अदानी समूहाला प्रवर्तक गट साधनांत म्हणजेच व्हीसीपीएलच्या ९९.५ टक्के स्वारस्य आणि पयार्याने एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के हिस्सेदारीचा दावाही करता येणार नाही, असे यातून सूचित करण्यात आले आहे. मंगळवारी आधी व्हीसीपीएल या कंपनीवर ताबा आणि पाठोपाठ तिचे नवीन मालक या नात्याने न फेडलेल्या कर्जाचे वृत्तवाहिनीतील २९.१८ टक्के भांडवली हिस्सेदारीत रूपांतरित करण्याचा पर्याय आजमावत असल्याचे घोषित करणाऱ्या अदानी समूहासाठी ही बाब धक्कादायक ठरू शकते. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटपर्यंत उसळी घेत एनडीटीव्हीचा समभाग ४०७.६० या वार्षिक उच्चांकी पातळीपर्यंत वधारला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndtv adani group deal has ravish kumar resigned from after adani takeover journalist tweets scsg
First published on: 26-08-2022 at 14:38 IST