Jantar Mantar CJP Protest Student Emotional Video : नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात विद्यार्थ्यांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या विरोधात कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सोमवारी मोठं आंदोलन केलं. मात्र, आपल्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या तीव्र लाठीचार्जची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आंदोलनादरम्यानचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतील.
याच आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात एक तरुण विद्यार्थी जखमी झाला. वेदनेने विव्हळत तो तरुण रस्त्यावरच खाली बसला होता. त्याला साधे नीट उठून चालणंही कठीण झाले होते. लाठीचार्जमुळे आसपास गोंधळ आणि पळापळ सुरू होती. अशातच त्याच्या मोबाईलवर अचानक त्याच्या ‘आईचा’ फोन आला. यावेळी तो आईशी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्हिडीओत पाहू शकता की, शरीरावर गंभीर दुखापत असतानाही त्या तरुणाने फोन उचलला आणि अतिशय शांत, पण थरथरत्या आवाजात म्हणाला– “आई, मी एकदम ठीक आहे, सर्व काही सुरळीत सुरू आहे, नारेबाजी करतो त्यामुळे आवाज थोडा कापतोय, बाकी सर्व ठीक आहे; आम्ही जिंकणार, मी कॉल करतो तुला नंतर.” आईला आपल्या दुखापतीची माहिती मिळून ती घाबरू नये, म्हणून वेदना लपवून आईशी खोटे बोलणाऱ्या या मुलाचा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जखमी विद्यार्थ्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ व्हायरल
लाठीचार्जनंतर त्याला पायाला गंभीर दुखापत झाली आहे, साधं उठून तो चालू शकत नाही अशी परिस्थिती होती, अनेक लोक त्याला मदत करत होते. याचदरम्यान आईच्या एका कॉलने त्या तरुणाने स्वतःचे सगळे दुःख आणि वेदना एका क्षणात गिळून घेतल्या.
“न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी रानटी कारवाई”
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून आणि पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी रानटी कारवाई का?” असा थेट सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. या एकाच व्हिडीओने विद्यार्थ्यांचा संघर्ष आणि पालकांविषयीचे प्रेम एकाच वेळी समोर आणले आहे. नीट पेपर लीक प्रकरणाचा हा लढा आता केवळ परीक्षेपुरता मर्यादित राहिला नसून, तो विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा आणि अस्तित्त्वाचा लढा बनला आहे.
