NEET UG 2026: वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ही लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठं आव्हान असते. पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित यश मिळालं नाही, तर अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळतो. मात्र, काही विद्यार्थी अपयशाला थांबण्याचं कारण न बनवता त्यातून पुन्हा उभे राहतात. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील देवकीपूर गावचा प्रभात कुमार यादव याची कहाणीही अशीच आहे.
पहिल्या प्रयत्नात प्रभातला ५०४ गुण मिळाले होते. मात्र, त्याने हार मानली नाही. डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आणखी एक वर्ष तयारी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने तब्बल ६२७ गुण मिळवत ऑल इंडिया रँक ३,८६४ मिळवला. या यशामुळे आता त्याला लखनऊमधील प्रतिष्ठित King George’s Medical University (KGMU) येथे MBBS करण्याची संधी मिळाली आहे.
५०४वरून थेट ६२७ मार्क्स; दुसऱ्या संधीने बदललं चित्र
प्रभातचा पहिला NEET प्रयत्न अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्याला ५०४ गुण मिळाले. मात्र, त्याने त्याला अंतिम निकाल मानलं नाही. त्याने ड्रॉप घेऊन पुन्हा एकदा NEETची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात सातत्याने केलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि त्याने आपली कामगिरी मोठ्या प्रमाणात सुधारत ६२७ गुण मिळवले. NEET UG 2026 मध्ये त्याला ३,८६४ ऑल इंडिया रँक मिळाली. प्रभातची शैक्षणिक कामगिरी यापूर्वीही चांगली होती. त्याने दहावीत ८९.४४ टक्के, तर बारावीत ८३.४४ टक्के गुण मिळवले होते.
गावातून कोट्यापर्यंतचा प्रवास
प्रभातने NEETची तयारी आपल्या गावातूनच सुरू केली. मात्र, परीक्षेची अधिक चांगली तयारी करण्यासाठी तो राजस्थानातील कोटा येथे गेला आणि क्लासरूम कोचिंग घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला त्याच्या कोचिंग इन्स्टिट्यूटकडून ५० टक्के फी सवलत मिळाली होती. तरीही उर्वरित खर्च उचलणं त्याच्या कुटुंबासाठी सोपं नव्हतं. अशा परिस्थितीत त्याचे मामा दयाराम यादव मदतीला पुढे आले. त्यांनी प्रभातच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आणि त्याची NEETची तयारी सुरू राहावी यासाठी आधार दिला.
मुंबईत रिक्षा चालवणाऱ्या वडिलांची मेहनत
प्रभातच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचीही मोठी मेहनत आहे. त्याचे वडील महेंद्र कुमार यादव गेल्या जवळपास २० वर्षांपासून मुंबईत ऑटो-रिक्षा चालवतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत काम करत असतानाच ते आपल्या कमाईतील पैसे गावातील कुटुंबाला पाठवत होते. मीडिया रिपोर्टनुसार, ते मुंबईतील एका छोट्या चाळीत राहत होते, तर प्रभात आपल्या आई बन्सराजी, आजोबा इंद्र बहादूर यादव आणि भावंडांसोबत देवकीपूर येथे राहत होता.
वडिलांच्या मेहनतीच्या कमाईतून घराचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जात होता. त्याचबरोबर मामाच्या मदतीने प्रभातला कोट्यात राहून NEETची तयारी करण्याची संधी मिळाली.
आता डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे एक मोठं पाऊल
पहिल्या प्रयत्नातील ५०४ गुणांनंतर प्रभातने अभ्यास सोडला नाही. उलट त्याने आपली तयारी आणखी मजबूत केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ६२७ गुण मिळवत MBBS प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. देवकीपूर गावातून सुरू झालेला प्रवास आता लखनऊच्या KGMUपर्यंत पोहोचला आहे. प्रभातचं यश हे केवळ NEETमधील गुणांची गोष्ट नसून, अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करण्याच्या जिद्दीचीही कहाणी आहे.
