NEET UG Re-Exam: पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच झालेला मनस्ताप, त्यात पुन्हा कशी तरी परिक्षा देण्याची संधी मिळाली खरं पण शेवटच्या क्षणी ती देखील हातातून निसटली. नशिबाने असा खेळ खळेला की थेट तोंडावरच बंद झालं परिक्षा केंद्राचे दार. नुकतीच देशभरात नीट-यूजी (NEET-UG) २०२६ ची पुनर्परीक्षा पार पडली पण बंगळुरूतील काही विद्यार्थ्यांना मात्र ही संधी मिळालीच नाही. कारण परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अवघ्या काही मिनिटे उशिर झाल्याने त्यांना प्रवेश नाकारला आणि विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेरच आक्रोश सुरू केला.

दिवस-रात्र अभ्यास करून जे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिले ते क्षणार्धात धुळीत मिळालं. विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे कष्ट सर्व काही वाया जाताना पाहून बंद गेटच्या बाहेर विद्यार्थी ढसाढसा रडत होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी विद्यार्थ्यांना उशीर होण्याचे कारण होते वाहतूक कोंडी.

गेटवरून चढण्याचा विद्यार्थ्याचा हताश प्रयत्न

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये, बंगळूरमधील पॅलेस रोडवरील शासकीय रामनारायण चेलाराम कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थी हताश झालेले दिसत आहेत. प्रशासनाने त्यांना आत प्रवेश देण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर, एका विद्यार्थ्याने अत्यंत हताश होऊन थेट बंद असलेल्या गेटमधून चढण्याचा प्रयत्न केला. अशीच दृश्ये केवळ बंगळूरमध्येच नव्हे, तर देशाच्या इतर भागांमध्येही समोर आली आहेत, जिथे कट-ऑफ वेळेनंतर पोहोचलेल्या उमेदवारांना कडक नियमांमुळे प्रवेश नाकारण्यात आला.

रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी ठरली कारण?

रविवारी बंगळूरु येथील पॅलेस ग्राऊंडवर काँग्रेसची रॅली आणि अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचायला उशीर झाल्याचे वृत्त आहे.

दुपारी ठीक १:३० वाजता प्रवेश बंद

राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उमेदवारांना सकाळी ११:०० वाजल्यापासून परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार दुपारी ठीक १:३० वाजता बंद करण्यात आले. यावर्षी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, बायोमेट्रिक पडताळणी आणि चेहरा ओळखण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. याच कारणास्तव, NTA ने उमेदवारांना केंद्रावर खूप आधी पोहोचण्याचा सल्ला दिला होता.

कडक सुरक्षेत २२ लाखांहून अधिक उमेदवार

मागील परीक्षेत पेपरफुटी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ही फेरपरीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत घेतली जात आहे. देशातील ५५१ शहरे आणि परदेशातील १४ शहरांमधील ५,४४० केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असून, २२ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १.३८ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय-आधारित प्रणाली तैनात करण्यात आल्या आहेत.