scorecardresearch

मनुस्मृती जाळून सिगारेट पेटवणारी आणि चिकन शिजवणारी प्रिया म्हणते, “मला धूम्रपान करणं आणि चिकन खाणं..”

प्रिया दास या तरूणीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये प्रिया दास मनुस्मृती जाळून सिगारेट ओढताना दिसते आहे.

Who is Priya Daas Who Burns Manusmriti
काय म्हटलं आहे प्रिया दासने?

मनुस्मृती जाळून सिगारेट पेटवणारी आणि चिकन शिजवणारी प्रिया नावाची मुलगी सध्या तिच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या मुलीचं नाव प्रिया दास असं आहे. ती बिहार शेखपुरामधली राहणारी आङे. २७ वर्षीय प्रिया दास राष्ट्रीय जनता दल (RJD ) च्या महिला शाखेची प्रदेश सचिव आहे.प्रिया दास चर्चेत येणाचं कारण तिचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्रिया दास ही मनुस्मृती जाळून त्यावर सिगारेट शिलगवताना दिसत आहे.

प्रिया दासने मनुस्मृती का जाळली?

प्रिया दास सांगते की मी ५०० रूपये खर्च करून मनुस्मृती घेतली. या मनुस्मृतीत असं लिहिलं आहे की जर महिलांनी मद्यपान केलं किंवा धूम्रपान केलं तर त्यांना अनेक प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. तसंच हा न्याय कुणाच्या बाबतीत करायचा आहे? म्हणजेच कुठल्या जातीच्या व्यक्तीला शिक्षा करायची आहे ते देखील मनुस्मृतीत लिहिलं आहे. जातीप्रमाणे शिक्षा काय आहेत त्या ठरवण्यात आल्या आहेत ते मला मुळीच पटलं नाही त्यामुळे मी मनुस्मती जाळली आणि त्यावर सिगारेट शिलगावली तसंच ते जाळून त्यावर चिकनही शिजवलं असं प्रिया दास सांगते.

मी नॉनव्हेज खात नाही, सिगारेटही ओढत नाही

प्रिया दासने आज तकला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं की माझा व्हिडिओ ट्विटरसह इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लाख लोकांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आहे. तसंच शेकडो लोकांनी माझं मनुस्मृती जाळणं हे गैर आणि साफ चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे. तसंच माझ्या सिगारेट पेटवण्याचा आणि चिकन शिजवण्याचाही अनेकांनी निषेध नोंदवला आहे. अशात एक गोष्ट सांगते की मी सिगारेटही पित नाही आणि नॉनव्हेजही खात नाही. मनुस्मृतीला माझा विरोध दर्शवण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी तसं वर्तन केलं असंही प्रियाने सांगितलं आहे.

राजकारण हा विषय प्रिया अभ्यासते आहे त्याचसोबत ती शिक्षिका होण्याच्याही प्रयत्नात आहे. त्यासाठी प्रियाने CTET पास केलं आहे. आता ती पीएचडीही करण्याचा प्रयत्न करते आहे. मी एक दलित कार्यकर्ती आहे. प्रिया म्हणते मी व्हिडिओत मनुस्मृती जाळताना दिसते आहे. मात्र या गोष्टीचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता.मनुस्मृती जाळणं हा कुठल्याही व्यक्तीचा अपमान करणं नाही तर गलिच्छ आणि किळसवाणा जातीयवाद, ढोंगी विचार या सगळ्यांचा निषेध नोंदवणं हेच मला पटलं म्हणून मी तसं वर्तन केलं असंही प्रिया दासने सांगितलं. प्रिया दास सांगते ही तर एक सुरूवात आहे. अशा प्रकारची पुस्तकं नष्टच केली पाहिजेत. मनुस्मृती हे काही असं पुस्तक नाही जे वाचून तुमचं ज्ञान वाढेल. हे पुस्तक लोकांमध्ये उच्च-नीच, भेदभाव, लोकांना वाटण्याचं काम करणारं आहे त्यामुळेच मी ते जाळलं असंही प्रिया दास सांगते.

जेवढ्या कुप्रथा आहे त्यांचं मूळ आहे मनुस्मृती

प्रिया दास म्हणाली की मनुस्मृती या पुस्तकात महिलांबाबत अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या अयोग्य आहेत. या पुस्तकाचं एक-एक पान फाडलं पाहिजे आणि जाळलं पाहिजे असंही प्रिया सांगते. प्रिया दासने म्हटलं आहे दलित लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि या मनुस्मृतीचा विरोध केला पाहिजे. प्रिया या दरम्यान हा दावाही केला आहे की समाजात जेवढ्या कुप्रथा आहेत त्याचं मूळ मनुस्मृती आहे. महिलांशी संबंधित प्रथा असतील किंवा लग्नाशी संबंधित असलेल्या प्रथा परंपरा असतील त्याचं मूळ मनुस्मृती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती अशीही आठवण प्रिया दासने करून दिली आहे.

प्रिया दासला हा प्रश्नही विचारण्यात आला की सिगारेट का शिलगावलीस? सिगारेट पिणं तर आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यावर तिने सांगितलं की मी सिगारेट ओढत नाही तसंच चिकनही खात नाही. मात्र मी सिगारेट शिलगावली याचं कारण जे चुकीचं आहे ते मला त्यातून ध्वनित करायचं होतं. मी कुणालाही हे सांगत नाही त्यांनी सिगारेट ओढावी. मला निषेध नोंदवायचा होता आणि ती माझी पद्धत होती त्यामुळे मी तसं वर्तन केलं. मनुस्मृतीमध्ये स्त्रिया हे करू शकत नाहीत, ते करू शकत नाहीत असं म्हटलं गेलं मग मी निषेध का करू नको? मला लोकांनी विरोध दर्शवला पण आता मी निषेधाचं पाऊल उचललं आहे आणि मी आता मागे हटणार नाही असंही प्रिया दासने सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 19:02 IST