Nepal Fact Check Video : राज्यात काही ठिकाणी मुसळधार सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते, महामार्ग पाण्याखाली गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटला, तर काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षेसाठी दुसऱ्या ठिकाणी हलवले जात आहे. अशात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत असलेल्या विद्यार्थ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लाईटहाऊस जर्नालिझमला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. व्हिडीओमध्ये शाळकरी मुलं तारेला अडकवलेल्या एका लोखंडी बास्केटमधे बसून नदी ओलांडताना दिसत आहेत. काही मुलं या बास्केटमध्ये, तर काही मुलं बास्केटच्या वर बसून प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी केल्या जाणाऱ्या अशा जीवघेण्या प्रवास पाहून सरकार जेवढी कावड यात्रेसाठी मेहनत घेत आहे, तेवढीच मेहनत या मुलांसाठी रस्ते बनविण्यासाठी घेतली, तर बरे होईल, असा टोलाही या पोस्टमधून केंद्र सरकारला मारण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कोणत्या राज्यातील आहे, त्यामागचे सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊ… (Fact Check video) काय होत आहे व्हायरल? X यूजर Inderjeet Barak ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला. इतर वापरकर्तेदेखील समान दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत. तपास : आम्ही व्हिडीओंमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपास सुरू केला. आम्हाला, '@FreeDocumentary' लिहिलेले एक वॉटरमार्कदेखील सापडले. रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान, आम्हाला इन्स्टाग्राम प्रोफाइल Infomance वर व्हिडीओ सापडला. ११ जून रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये 'नेपाळमधील शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठीचा रोजचा संघर्ष' असा मजकूर होता. Read More Fact Check News : मुंबईत रुळांवरून लोकल ट्रेन थेट चढली प्लॅटफॉर्मवर अन् लोकांनी मारल्या उड्या…; अपघाताच्या थरारक घटनेचा Video कधीचा? वाचा सत्य घटना तपासादरम्यान आम्हाला एक वेबसाइटदेखील सापडली; ज्यामध्ये व्हिडीओचे शीर्षक होते, 'शाळेत जाण्यासाठी सर्वांत धोकादायक मार्ग - नेपाळ सांस्कृतिक माहितीपट'. त्यानंतर आम्ही यूट्यूबवर कीवर्ड सर्च करून व्हिडीओ शोधला. आम्हाला 'फ्री डॉक्युमेंटरी'च्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. आम्हाला व्हायरल व्हिडीओवर वॉटरमार्कही दिसला. हा व्हिडीओ ६ सप्टेंबर २०२५ रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडीओच्या शीर्षकात म्हटले आहे : शाळेत जाण्यासाठीचा सर्वांत धोकादायक मार्ग | नेपाळ | मोफत माहितीपट (Nepal School Children Fact Check Video) व्हिडीओ कुंपूरच्या डोंगराळ गावातील असल्याचे वर्णनात नमूद करण्यात आले आहे. धाप पर्वतावर कुंपूर हे आहे, अत्यंत दुर्गम भागात हे गाव वसलेले आहे. सुमारे २२.४४ मिनिटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये व्हायरल व्हिडीओमधील दृश्ये व्यवस्थित पाहता येतील. ज्यात सांगितले आहे की, लोखंडी बास्केट नदीच्या मध्यभागी आली की ते थांबते. त्यानंतर इतर तीन विद्यार्थी ती बास्केट ढकलतात. निष्कर्ष : शाळेत जाण्यासाठी नदी पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारतातील नाही. हा व्हिडीओ नेपाळमधील कुंपूर गावातील आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.