Nepal Flood Survived House Video: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला तर, हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. प्रलंयकारी पुरामुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. तसेच, इमारती, पूल कोसळले. पुराबरोबर आलेल्या माती आणि दगड- धोंड्यांमुळे मोठा विध्वंस झाला. अशात पुराच्या पाण्याने चारीबाजुने वेढले असताना एक दोन मजली इमारत तग धरुन असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पुराचे भयंकर प्रवाह, ऊंचच्या ऊंच लोट प्रवाहीत असताना या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही नागिरक जीव मुठीत घेऊन धांबले आहेत. भीषण पुरामुळे जिथं, गावं, पूल, वाड्या, वस्त्या वाहून गेल्या इमारतींचे नुकसान झाले तिथं या दोन मजली घराने कसा तग धरला? महापुरात या घराचा कसा निभाव लागला? याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
विनाशकारी पुरात घर, इमारतींचे नुकसान
नेपाळच्या महापुरात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला, हजारो नागरिक बेपत्ता झाले. अशात या घरात असलेले नागरिक आणि ही दोन मजली इमारत मात्र सुखरुप राहिली. पुराच्या पाण्याचे भीषण लोट इमारतीच्या भिंतीवर आदळत असताना, पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणारे दगड-धोंडे, उन्मळून पडलेली झाडे याचे तडाखे बसत असताना देखील ही इमारत पुराच्या पाण्यात तग धरुन उभी राहिली. शिवाय या घरातील लोक देखील सुखरुप बचावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शिवाय विध्वंसक महापुरात विनाशकारी घटना समोर आल्या असताना घर सुखरुप राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, या घराच्या बांधकाम आणि बांधकाम साहित्याबाबतही चर्चा होऊ लागली आहे.
दोन मजली घर सुखरुप
महापुरात देखील हे घर बचावले हा चमत्कार किंवा नशिबाचा भाग नाही, यामागे बांधकाम आणि अभियांत्रिकी आविष्कार असल्याचे मत आता काहीजण सोशल मीडियावर मांडू लागले आहेत. या घराच्या शेजारील इतर इमारती, घरं कोसळली तरी हे घर टिकून राहिल्याबाबत अनेकजण मत व्यक्त करत आहेत. एक्सवर आर्किटेक्चर प्रेझेंन्टेशन या खात्यावरुन याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
‘ते’ एकच घर कसं बचावले?
“हिमालयातील अनेक घरं दगडांनी बांधलेली असतात, यात सिमेंट काँक्रिटचा कमी वापर केला जातो. त्यामुळे उभे बांधकाम उभा भार अथवा झटका पेलू शकते. पण भिंतीच्या समांतर अथवा बाजूने जोराचा धक्का बसल्यास बांधकाम कोसळू शकते. दरम्यान, पुरात अडकलेले हे घर सिमेंट काँक्रिटचा वापर करुन बांधण्यात आले आहे. यात देखील त्याचा लोखंडी सळईचा वापर करुन बांधण्यात आलेला चौकोणी घेर (फ्रेम), काँक्रिटचे कॉलम आणि पाया असा मिळून होणारा एकत्र सांगाडा इमारतीला अधिक मजबूत करतात. पाण्याचा प्रवाह आणि गाळ भिंतींना धडकला मात्र त्याचा प्रत्यक्ष झटका न बसता तो बांधकामामुळे खोल जमिनीत शोषला गेला”, असे स्पष्टीकरण या व्हिडीओत देण्यात आलंय.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, पाण्याचा आणि गाळाचा प्रवाह वेगाने होत असला तरी हा सर्व प्रवाह एका खोल मार्गातून प्रवाहीत झाला. हे घर मात्र, मुख्य मार्गापासून थोडं वराच्या भागावर म्हणजेच उंचावर आहे. यामुळे प्रवाह दोन भागात विभागला गेला आणि इमारतीच्या दोन्ही बाजूंनी प्रवाहीत झाला. यामुळे प्रवाहासह आलेला गाळ इमारतीच्या सभोवती उतरत्या दिशेने साचला आणि पाण्याचा भेट झटका भिंतीला बसला नाही आणि घराचे नुकसान झाले नाही, असे या व्हिडीओत म्हटले आहे.
