Speak for Justice Without Getting Into Unnecessary Arguments : आचार्य चाणक्य यांनी जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप महत्त्व दिले आहे. कधीकधी, काही परिस्थितीमध्ये मौन बाळगणे शहाणपणाचे मानले जाते. पण, मौन बाळगणे नेहमीच योग्य नसते. काही विशिष्ट मुद्द्यांवर वेळेवर न बोलल्यास, समोरची व्यक्ती तुमच्या मौनाला तुमचा कमकुवतपणा समजू शकते. त्यामुळे चाणक्य नीती सत्य, न्याय, आत्मसन्मान आणि योग्य वर्तनाला विशेष महत्त्व देते. म्हणूनच, काही विशिष्ट परिस्थितीत आपले विचार स्पष्टपणे मांडणे खूप महत्वाचे ठरते. चला, तर अशा पाच प्रसंगांबद्दल जाणून घेऊया जेव्हा तुम्ही गप्प राहणे टाळले पाहिजे.

सत्य आणि न्याय

जर तुमच्या समोर कोणावर अन्याय होताना दिसत असेल, तर गप्प बसू नका. जेव्हा सत्य व न्यायाचा प्रश्न येतो. तेव्हा योग्य गोष्टीसाठी आवाज उठवा. त्यामुळे हा नियम फक्त तुमच्यापुरता मर्यादित नाही; इतर कोणावरही अन्याय होत असेल, तरी त्याविरोधात बोलण्यास संकोच करू नका. मात्र, आपले मत व्यक्त करताना शब्द आणि वर्तन यांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांतपणे आणि योग्य पद्धतीने आपली बाजू मांडणे अधिक प्रभावी ठरू शकते.

आत्मसन्मान

तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचू देऊ नका. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे. जर वारंवार तुमचा कोणीतरी अपमान करत असेल तर गप्प बसणे योग्य नाही. अशा परिस्थितीत, समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगा की, तुम्हाला त्यांचे वर्तन अजिबात मान्य नाही. तुमच्या भूमिकेवर ठाम रहा.

मेहनत आणि यश

नेहमी शांतपणे आणि संयमाने बोलणे चांगले असते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आपल्या मेहनतीची किंमत इतरांना कळू देऊ नये. तुम्ही एखादे महत्त्वाचे काम केले असेल किंवा एखादे मोठे यश मिळवले असे. तर त्याची योग्य पद्धतीने माहिती इतरांपर्यंत पोहोचू द्या. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल सांगताना असे बोला की, तुम्ही स्वतःची स्तुती किंवा प्रसिद्धी करत आहात असे कोणालाही वाटणार नाही.

गैरसमज

नात्यांमधील छोटे गैरसमज देखील कालांतराने मोठी समस्या बनू शकतात. जर कोणाला काही त्रास होत असेल, तर ते स्वतःपुरते ठेवण्याऐवजी त्यांच्याशी शांतपणे बोलणे चांगले. संभाषणाने अनेक गैरसमज दूर होऊ शकतात, जे अनेकदा शांततेमुळे वाढत जातात. आपले मत व्यक्त करताना, आरोप करण्याऐवजी आपल्या भावना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.

अन्याय

जर कोणी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेऊन तुमच्याशी वारंवार गैरवर्तन करत असेल, तर गप्प बसण्याऐवजी आवाज उठवणे महत्त्वाचे आहे. संयम बाळगून सर्व काही सहन करणे नेहमीच योग्य नसते. कधीकधी समोरच्या व्यक्तीला, “आपल्या मर्यादेत राहा,” असे स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही तुमचे मत शांतपणे पण ठामपणे मांडता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला हे समजते की तुमच्या सहनशीलतेला कधीही कमजोरी समजण्याची चूक करू नये.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)