new born rhino viral video : बाळ जन्माला आले की, त्याला पाहण्याची उत्सुकता सगळ्यांमध्ये असते. ते कोणासारखे दिसतेय, त्याचे वजन किती आहे याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला आवडते. मग ते बाळ प्राण्याचे असेल किंवा माणसाचे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जशी नवजात बाळाची नोंद ठेवली जाते, तशी भारतातील राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याचीसुद्धा नोंद ठेवली जाते. मोठा झाल्यावर तो प्राणी जरी आक्रमक दिसत असला तरीही लहान असताना त्याचे निरागस रूप पाहायला मिळते. भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रवीण कासवान यांनी असेच काहीसे दृश्य दाखविणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

जर तुम्ही यापूर्वी कधीही गेंड्याचे एक दिवसाचे पिल्लू कसे दिसते हे पाहिले नसेल, तर हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे. मोठ्या झाडाच्या खोडापाशी निरागसपणे चालण्याचा प्रयत्न करताना हे गेंड्याचे पिल्लू दिसत आहे. त्यावरून या नुकत्याच जन्मलेल्या प्राण्याची नियमित आणि व्यवस्थित देखरेख (monitoring) करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. गेंड्याचे एक दिवसाचे पिल्लू कसे दिसते ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

“प्राण्याच्या नवजात बाळाच्या जवळ जाणे सुरक्षित असते का?

मात्र, या व्हिडीओमुळे सुरक्षेबाबतही काही प्रश्न उपस्थित झाले. “प्राण्याच्या अशा नवजात बाळाच्या जवळ जाणं सुरक्षित आहे का? काळजीपोटी आई हल्ला करत नाही का“, असे प्रश्न एका युजरने विचारले आहेत. त्या प्रश्नावर उत्तर देताना कासवान यांनी सांगितले की, अशा प्राण्यांच्या जवळ जाणं अजिबात सुरक्षित नाही. त्यांची आई नक्कीच हल्ला करू शकते; पण माहितीसाठी म्हणून हा व्हिडीओ जवळ जाऊन नाही, तर लांबून झूम करून शूट केला आहे. तेव्हा ते पेट्रोलिंग करीत होते आणि प्रशिक्षित हत्तीवर बसून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास १७ हजार व्ह्युज मिळाले असून, हा व्हिडीओ खूप दुर्मीळ आणि मनाला आनंद देणारा आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. गेंडे दिसायला शांत दिसत असले तरीही थोडासुद्धा धोका वाटला, तर ते खूप आक्रमक होऊ शकतात. आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी ते पटकन हल्ला करू शकतात. ज्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे खूप गरजेचे आहे.