गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात १३ मे रोजी एका इलेक्ट्रॉनिक टेडी बेअरच्या स्फोटात २५ वर्षीय नवविवाहित तरुण आणि त्याचा तीन वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाले. हा टेडी बेअर वधूला भेट म्हणून देण्यात आला होता. या घटनेत वधूच्या वडिलांनी संशयाच्या आधारे मोठ्या मुलीपासून विभक्त राहणाऱ्या लिव्ह-इन पार्टनरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी नवसारी जिल्ह्यातील वांसडा तालुक्यातील मिंडाबारी गावातील ३२ वर्षीय लतेश गावित यांचा विवाह शेजारील जंगपूर गावातील २८ वर्षीय सलमा हरिश्चंद्र गवळी या शिक्षिकेशी झाला होता. मंगळवारी लतेश आणि त्याचा पुतण्या जियांश लग्नाचे गिफ्ट्स उघडत असताना स्फोट झाला.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वधूचे वडील हरिश्चंद्र गवळी म्हणाले, “लतेशला लग्नाची भेट म्हणून एक सुंदर टेडी बेअर मिळाला होता. त्याने स्वीच बोर्डला तो टेडी कनेक्ट करून बटण दाबताच स्फोट झाला आणि लतेश आणि जियांश हे दोघे जखमी झाले. सलमा आणि कुटुंबातील बाकी सदस्य इतर खोल्यांमध्ये होते आणि स्फोट ऐकून बाहेर आल्याचेही हरिश्चंद्र यांनी सांगितले.

टेडी बेअरबद्दल विचारल्यानंतर सलमाने सांगितले की, ही भेट तिला शेजारच्या कंबोया गावातील आशा कार्यकर्त्या आरती पटेल यांनी दिली होती. या संदर्भात आरतीशी बोलले असता तिने सांगितलं की राजू पटेलने या जोडप्याला भेट म्हणून हा टेडी बेअर दिला होता. आधीच विवाहित असलेला राजू पटेल सलमाची मोठी बहीण जागृती हिचा लिव्ह-इन पार्टनर होता. दोघे पाच वर्षे एकत्र राहत होते आणि त्यांना एक मुलगी आहे.

वांसदा पोलीस उपनिरीक्षक व्हीएन वाघेला यांनी सांगितले की, आरोपी राजू पटेल याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. जागृती तीन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेल्याने राजू पटेल हा जागृती आणि तिच्या पालकांवर राग मनात धरून होता, त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने हा प्लॅन केला. परंतु त्यांच्याऐवजी नवरदेव आणि त्याचा पुतण्या स्फोटात जखमी झाले.