Viral Video : ठळक बातम्या वाचताना Live Telecast दरम्यान अँकरने केली पगाराची मागणी

वृत्तवाहिनीवर प्रमुख बातम्या वाचत असतानाच अचानक अँकरने आपल्या पगाराचा मुद्दा बातम्या सांगतानाच उपस्थित केला, हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय

News anchor demands his salary on live TV
लाइव्ह शोमध्ये पगाराची मागणी करणाऱ्या अँकरचं नाव काबिंदा कालिमिना असं आहे.

झाम्बियामधील एका वृत्तवाहिनीवरील अँकरने बातम्या सांगतानाच लाईव्ह शो दरम्यान आपला थकीत पगार देण्याची मागणी केली. या अँकरने लाइव्ह शो दरम्यान केलेल्या मागणीचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केबीएन टीव्ही न्यूज (केनमार्क ब्रॉडकास्टींग नेटवर्क) या वृत्तवाहिनीवर प्रमुख बातम्या वाचत असतानाच अचानक अँकरने आपल्या पगाराचा मुद्दा बातम्या सांगतानाच उपस्थित केला. यावेळी लाईव्ह प्रक्षेपण सुरु असल्याने त्याची ही मागणी या वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचली. लाइव्ह शोमध्ये पगाराची मागणी करणाऱ्या अँकरचं नाव काबिंदा कालिमिना असं आहे. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कंपनीने पगार दिलेला नाही, असं काबिंदाने प्रमुख बातम्या वाचून झाल्यानंतर म्हटलं.

नक्की वाचा >> ११ लाख ८८ हजारांची टिप… २७०० रुपयांच्या बिलावर दिली लाखो रुपयांची टिप

“बातम्या बाजूला ठेवल्या तर आम्ही पण माणसं आहोत. आम्हालाही कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. मात्र दुर्दैवाने आम्हाला केबीएनकडून पगार मिळालेला नाही,” असं काबिंदाने म्हटलं. यानंतर वृत्तवाहिनीने आपली भूमिका मांडणारं पत्रक जारी केलं आहे. यामध्ये कंपनीने काबिंदाचं वागणं हे दारुड्या व्यक्तीसारखं होतं तसेच हा सर्व रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी केलेला स्टंट असल्याचं वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. मात्र काबिंदाने वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला दावा फेटाळून लावलाय. मी दारु प्यायलेल्या अवस्थेत असतो तर मी आधीचा पूर्ण शो कसा केला असता?, असा प्रश्न त्याने वृत्तवाहिनीला विचारलाय.

केबीएन टीव्हीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी केंडी के मांम्बवे यांनी वृत्तवाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन स्पष्टीकरणाचं पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी काबिंदा हा पार्ट टाइम कर्मचारी असल्याचं म्हटलं आहे. तसेच काबिंदाला मुख्य बातम्यांसाठी संधी कोणी व का दिली यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई केली जाईल असंही केंडी यांनी स्पष्ट केलं आहे. दोन वर्षांपूर्वीच सुरु झालेल्या केबीएनमध्ये आम्ही फार कौशल्य असणाऱ्या लोकांसोबत आणि तरुण टीम सोबत काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळेच काबिंदाने केलेलं हे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठी होतं. मात्र असं असलं तरी आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

kbn TV statement

असं असलं तरी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या वृत्तवाहिनीच्या कारभारासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: News anchor demands his salary on live tv in zambia goes viral scsg

ताज्या बातम्या