अमेरिकेतील एका भारतीय महिलेला न्यूयॉर्कमधील दूतावासात वाईट वागणूक देण्यात आली. भारतात वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ती व्हिसाची मागणी करत होती. मात्र तिला व्हिसा देण्याऐवजी दमदाटी करण्यात आल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तसेच तिला आणि तिच्या पतीला भारतीय व्हिसा मिळण्यापासून काळ्या यादीत टाकण्याची धमकीही देण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ सदर महिलेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ संबंधित कार्यालय आणि अधिकाऱ्यांना टॅग केला आहे.

“हे विजय शंकर प्रसाद आहेत, प्रभारी व्हिसा अधिकारी… हे… भारताचे प्रतिनिधित्व आहे का?”, अशी पोस्ट लिहिण्यात आली आहे. २४ नोव्हेंबरला हा प्रकार घडला. हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“माझ्या वडिलांचे निधन झाले आणि ही घटना मंगळवारी न्यूयॉर्क येथे घडली. माझ्या पतीला आणि मला भारतीय व्हिसा मिळण्यापासून काळ्या यादीत टाकण्याची धमकी देण्यात आली आणि NYPD ने आम्हाला बोलावले म्हणून मी सुमारे एक तास विनवणी केली. मी रडत असताना मला सुरक्षारक्षकाद्वारे असेही सांगण्यात आले की मी युनायटेड स्टेट्समध्ये राहतो आणि आता भारतीय नाही आणि मला कोणतेही अधिकार नाहीत.” असं त्या महिलेनं यांनी लिहिलं आहे. दुसरीकडे, लहान क्लिपवरून अधिकाऱ्याला शिक्षा देण्याऐवजी दुसरी बाजू समजून घ्यावी असाही काही नेटकऱ्यांचा कल आहे. एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांना दोष देणं चुकीचं असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे.

या व्हिडिओची दखल अमेरिकेतील काही भारतीयांना घेतली आणि त्यांना व्हिसा मिळवून देण्यात मदत केली. तसेच अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.