अनेक वेळा आपल्याकडे अशा काही वस्तू असतात ज्यांची खरी किंमत किंवा महत्त्व आपल्याला माहित नसतं. मात्र त्या वस्तूला बाजारामध्ये प्रचंड महत्त्व असतं. नायजेरियामध्येदेखील एका कुटुंबासोबत असंच काहीसं झालं आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून एक पेंटींग होतं. मात्र या पेंटींगचं महत्त्व त्यांना माहित नव्हतं. एक दिवस सहज उत्सुकता म्हणून या कुटुंबातील सदस्यांनी पेंटींगवरील स्वाक्षरी  गुगलवर सर्च केलं. विशेष म्हणजे या चित्रकाराची स्वाक्षरी सर्च केल्यानंतर त्यांच्यासमोर जी माहिती आली ती वाचून सारेच थक्क झाले.

या कुटुंबाकडे असलेल्या पेंटींगचा ११ लाख पाऊंड म्हणजे जवळपास तब्बल १० कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला होता. ही पेंटींग नायजेरियातील चित्रकार बेन इनवॉनवू यांनी १९७१ मध्ये रेखाटली होती. विशेष म्हणजे हे चित्र राजकुमारी एडीतुत यांचं असून त्यांना ‘अफ्रिकन मोनालिसा’ असंही म्हटलं जायचं. हे चित्र १९७१ पासून या कुटुंबाकडे आहे.


या कुटुंबातील सदस्यांनी एका संकेतस्थळावर पेंटींगवरील स्वाक्षरी सर्च केलं. त्यानंतर त्यांना या चित्राबद्दल संपूर्ण माहिती मिळाली. विशेष म्हणजे या पेंटींगचा लिलाव करताना जी मूळ रक्कम सांगण्यात आली होती.त्याच्यापेक्षा सात पटीने जास्त किंमतीला तिचा लिलाव करण्यात आला. दरम्यान, या पेंटींगला नायजेरियातील एक राष्ट्रीय आयकॉन मानलं जातं. हे पेंटींग काढणाऱ्या बेन इनवॉनवू यांचं १९९४ मध्ये निधन झालं. मात्र त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काढलेल्या चित्रांपैकी एडीतुत यांची तीन चित्रे विशेष लोकप्रिय झाली. १९६० पासून या चित्राला शांततेचं प्रतिक मानलं जातं.