लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत गाठण्यास अपयशी ठरल्यानंतर भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. एनडीएचे निवडून आलेले खासदार, मित्रपक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांना एकमताने संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले. भाजपाच्या वतीने राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला, त्याला अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी देशाला महाशक्ती बनविण्यासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत. गडकरींनी आपल्या भाषणात मोदींचे कौतुक केले असले तरी त्यांची काल दिवसभरापासून वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या भाषणात टाळ्या न वाजविल्याबद्दल गडकरींचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

विषय काय?

कालपासून नितीन गडकरी हे एक्सवर ट्रेंड होत आहेत. हजारो लोकांनी त्यांचे एनडीएच्या बैठकीतील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण सभागृह मोदीनामाचा गजर करून त्यांना उभे राहून अभिवादन करत असताना नितीन गडकरी मात्र शांतपणे आपल्या जागेवर बसून राहिल्याचे दिसत आहे. तसेच ते अभिवादनासाठीही उभे राहिले नाहीत.

नितीन गडकरी यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नितीन गडकरींच्या कृतीची तुलना इतिहासातील हिटलरच्या एका प्रसंगाशीही अनेकांनी केली आहे. हिटलरसमोर नाझी सेना, अधिकारी मान तुकवत असताना एखाच सैनिक शांतपणे बसून राहिल्याचे मिम यानिमित्ताने पोस्ट केले जात आहेत.

पण एनडीएच्या बैठकीतील हा एकच व्हिडीओ घेऊन नितीन गडकरी ट्रेंड झाले असे नाही. भाजपा विरोधकांनी जेव्हा नितीन गडकरींच्या कृतीवरून मोदींना घेरण्यास सुरुवात केली. तेव्हा भाजपा समर्थकांनीही इतर प्रसंगाचे व्हिडीओ बाहेर काढले.

नितीन गडकरी खरंच उभे राहिले नाहीत?

एएनआय या वृत्तसंस्थेने एनडीएच्या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबवर पोस्ट केलेला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी सभागृहात आल्यानंतर आणि त्यांनी संविधान माथ्याला लावून अभिवादन करत असताना दोन वेळा नितीन गडकरी आपल्या जागेवरून उठून प्रतिसाद देताना आणि मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत.

सभागृहात आल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा स्थानापन्न झाले, तेव्हा पुन्हा एकदा सभागृहात मोदी मोदी असा जयघोष सुरू झाला. त्याबद्दल कृतज्ञता दाखविण्यासाठी मोदी उभे राहिले. ते उभे राहिल्यामुळे पुन्हा एकदा सभागृहातील सर्वच नेते उभे राहिले. फक्त याच प्रसंगी नितीन गडकरी आपल्या जागी बसून होते. नेमक्या याच प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

नरेंद्र मोदी सभागृहात आल्यानंतर नितीन गडकरींनी उभे राहून अभिवादन केले.

भाजपा समर्थकांकडून दुसऱ्या बाजूचेही व्हिडीओ समोर आले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमात नितीन गडकरी हे दोन ते तीन वेळा मोदींना अभिवादन करण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येते. नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना सर्व सभागृहाने उभे राहून त्यांचे अभिवादन केले होते. त्यात गडकरींचाही समावेश होता.

नरेंद्र मोदी भाषणासाठी आल्यानंतर नितीन गडकरींनी सर्व सभागृहासह त्यांना उभे राहून अभिवादन केले.

लोकसभेतील व्हिडीओही याआधी व्हायरल

नितीन गडकरी यांचे असे व्हिडीओ पहिल्यांदाच व्हायरल झाले असे नाही. याआधीही लोकसभेत अनेकवेळा नितीन गडकरी मोदींच्या भाषणात बाकं न वाजवता शांतपणे बसून राहिल्याचे व्हिडीओ समोर आले होते. मात्र त्याची चर्चा कालच्या बैठकीएवढी कधी झाली नव्हती. लोकसभेत भाजपाला म्हणावे तितके यश मिळाले नाही. विरोधकांनी मोदींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे नितीन गडकरींची ही कृती अधिक चर्चेत आली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे.