No Job, No Tension Techie Drives Uber By Choice : आजकाल कोणाची नोकरी कधी जाईल ते काही सांगता येत नाही. अचानक एक लेटर हातात दिलं जातं आणि दुसऱ्या दिवसापासून कामावर येऊ नको, असं सांगितलं जातं. त्यामुळे नोकरी हा आता सर्वांसाठीच फार चिंतेचा विषय बनतोय. विशेषत: स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे अचानक नोकरकपातीच्या बातम्या वाढताना दिसतायत. अनेक मोठमोठ्या कंपन्या एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत, ज्यामुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवतेय. पण, अशा परिस्थितीतही टेन्शन न घेता, भीती न बाळगता एका पठ्ठ्यानं कमाईचा असा काही मार्ग शोधून काढला की, तो वाचून तुम्हीही चकित व्हाल. त्याच्या मित्रानं सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट केलीय, ज्यात त्याने मित्र नोकरी गेल्यानंतरही हार न मानता, घरबसल्या महिन्याला हजारो रुपये कमावतोय, पण हे कसं शक्य आहे ते जाणून घेऊ….

अनेकांना पठ्ठ्याचा हा निर्णय स्मार्ट प्लॅनिंग असल्याचे म्हटलेय.

अलीकडेच ओरॅकलसारख्या एका मोठ्या कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले, ज्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची परिस्थिती ओढवली. पण, या कठीण परिस्थितीतही एका कर्मचाऱ्यानं परिस्थिती शांतपणे हाताळली आणि आता तो नोकरी न करताही हजारोंची कमाई करतोय. नोकरी गमावल्यानंतर शहरात राहून घाबरून जाण्याऐवजी किंवा संघर्ष करण्याऐवजी या कर्मचाऱ्यानं थेट भुवनेश्वरमधील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानं आपला खर्च कमी केला आणि कुटुंबासह राहू लागला, ज्यामुळे त्याच्यावरील आर्थिक ताण लक्षणीयरीत्या कमी झाला.

बचत ही सर्वांत मोठी ताकद

पण, या व्यक्तीची सर्वांत मोठी ताकद त्याची बचत होती. त्याच्या अनेक मुदत ठेवी होत्या, ज्यातून त्याला दरमहा ४० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. पोस्ट ऑफिस आणि बँकांमधील गुंतवणुकीमुळे नोकरी नसतानाही तो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होता.

नोकरी गमावली; पण ‘हे’ काम करू लागला

नोकरी गमावल्यानंतर त्यानं अजिबात वेळ वाया घालवला नाही. त्याला गाडी चालवता येत होती, त्यामुळे त्यानं लगेच ‘उबर’साठी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला नियमित उत्पन्न मिळू लागले आणि तो आपल्या गरजा सहजपणे भागवू शकला. केवळ नोकरी किंवा ड्रायव्हिंगपुरते मर्यादित न राहता, तो हळूहळू स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन करतोय. आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यानं तो कोणत्याही तणावाशिवाय भविष्यासाठी वाटचाल करीत आहे.

भविष्यासाठी केलेल्या प्लॅनिंगचे कौतुक

@NayakSatya_SG नावाच्या अकाउंटवरून ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली, ज्यामध्ये युजरनं आपल्या मित्रानं नोकरी गेल्यानंतर परिस्थिती कशी हँडल केली यावर भाष्य केलं आहे. ही पोस्ट आता लाखो लोकांनी पाहिली असून, युजर्स त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “म्हणूनच म्हटलं जातं की, बचत हा पैसे वाचवण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “प्रत्येकानं बचत केली पाहिजे.” आणखी एका युजरनं लिहिलं, “महिन्याला ४० हजार रुपयांमध्ये कोणीही चांगलं जीवन जगू शकतो.”