Interview Twist IT Worker Exposed Over Kim Jong-un Question: ऑनलाइन जगतात सध्या एक धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका साध्या दिसणाऱ्या नोकरीच्या मुलाखतीत अचानक असा ट्विस्ट येतो की मुलाखत घेणाऱ्यांनाही धक्का बसतो… आणि संशयित उमेदवाराची खरी ओळख उघडी पडते!
ही घटना एका IT जॉबसाठी घेतलेल्या ऑनलाइन इंटरव्ह्यूदरम्यान घडली. ‘तारो ऐकुची’ या जपानी नावाने अर्ज केलेला उमेदवार सुरुवातीला अतिशय आत्मविश्वासाने बोलत होता. त्याचे X, LinkedIn, GitHub आणि स्वतःची पोर्टफोलिओ वेबसाइटही होती. सर्व काही अगदी परफेक्ट वाटत होतं. चेहऱ्यावर हसू, बोलण्यात आत्मविश्वास; म्हणजे जणू काही तो नोकरीसाठी एकदम योग्य उमेदवारच!
पण काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली…
मुलाखत घेणाऱ्यांना त्या उमेदवारावर थोडा संशय आला आणि मग त्यांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारला, “तुम्ही किम जोंग-उन यांच्याबद्दल एक अपमानास्पद वाक्य बोलू शकता का?”
हा प्रश्न ऐकताच उमेदवाराचा चेहरा पूर्णपणे बदलला. काही क्षणांपूर्वी हसतमुख असलेला तो अचानक गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य गायब झाले… वातावरणात एक विचित्र शांतता पसरली… आणि काही सेकंदातच व्हिडीओ कॉल अचानक कट झाला! याच क्षणाने संशय अधिकच गडद झाला.
या व्हिडीओसोबत सोशल मीडियावर एक कॅप्शनही व्हायरल होत आहे. “हा एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे. किम जोंग-उन यांच्याबद्दल अपमानास्पद बोलायला सांगितल्यावर अनेकजण थेट थांबतात.”
खरंतर उत्तर कोरियामध्ये किम जोंग-उन किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद बोलणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. ते देशद्रोहासारखे समजले जाते आणि त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते; फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही परिणाम भोगावे लागू शकतात, म्हणूनच या मुलाखतीत विचारलेला हा साधा प्रश्न त्या उमेदवारासाठी मोठा सापळा ठरला.
दरम्यान, टेक क्षेत्रात एक मोठी चिंता समोर आली आहे. हजारो संशयित उत्तर कोरियन IT कामगार बनावट ओळखी वापरून परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे. हे लोक प्रगत तंत्रज्ञान, AI, डीपफेक आणि चोरीच्या ओळखींचा वापर करून मुलाखती पार करतात.
यामागचा उद्देश आंतरराष्ट्रीय निर्बंधांपासून बचाव करून आपल्या देशासाठी पैसा उभा करणे.
या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी अशा संशयित उमेदवारांना ओळखण्यासाठी वेगळे मार्ग शोधले आहेत; जसे की उत्तर कोरियाच्या नेत्यावर टीका करण्यास सांगणे.
मात्र, हा उपाय नेहमीच यशस्वी ठरेल असे नाही, कारण काही एजंट चीन किंवा रशियामध्ये कार्यरत असतात, जिथे त्यांच्यावर इतकी कडक नजर नसते.
तरीही या व्हिडीओने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, कधी कधी एक साधा प्रश्नही मोठे गुपित उघड करू शकतो… आणि एका क्षणात संपूर्ण खेळ संपवू शकतो!
