उत्तर कोरियामधील एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. या व्यक्तीने नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम या लोकप्रिय सिरीजच्या पायरेटेड कॉपी वितरीत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याच प्रकरणामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं असून आता फायरिंग स्वाडच्या माध्यमातून त्याला मृत्यूदंड देण्यात येणार आहे. याच प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामधील काही आरोपींवर तर बेकायदेशीरपणे ही सिरीज बघितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीय.

रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार बेकायदेशीरपणे स्क्विड गेमचं वितरण करणाऱ्या व्यक्तीने या मालिकेच्या पायरेटेड कॉपी चीनमधून मिळवल्या होत्या. मायदेशी परतल्यानंतर त्याने या कॉपी युएसबी पेन ड्राइव्हच्या माध्यमातून जास्त किंमतीला विकल्या. स्क्विड गेम ही नेटफ्लिक्सवरील सध्या सर्वाधिक चर्चेतील सिरीजपैकी एक आहे. नऊ भागांच्या या मालिकेमधील पैशांची गरज असणारे लोक एका गुप्त ठिकाणी लहान मुलांचे गेम खेळतात आणि एक एक लेव्हल पुढे जातात. मात्र पराभूत होणाऱ्या व्यक्तीला थेट ठार मारलं जातं असं मालिकेत दाखवण्यात आलंय. या मालिकेची जगभरामध्ये चर्चा आहे. मात्र उत्तर कोरियामध्ये जगभरातील सर्व मालिका आणि कंटेट उपलब्ध नाहीय. त्यामुळेच चोरुन ही मालिका पाहण्याचा मोह काहींना महागात पडलाय.

नक्की वाचा >> पायरेटेड CD बाळगल्याप्रकरणी मृत्यूदंड; फायरिंग स्वॉडने नातेवाईकांसमोरच केली त्याच्या शरीराची चाळण

या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्ती या विद्यार्थी आहेत. लपून छपून ही मालिका पाहिल्या प्रकरणी सहा जणांना पाच वर्षांसाठी सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलीय तर एकाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांकडे दूर्लक्ष केल्याप्रकरणी हे विद्यार्थी ज्या शाळेत जातात तेथील शिक्षक आणि प्रशासकांना निलंबित करुन शिक्षा म्हणून खाणकाम करण्यासाठी पाठवून देण्यात आलंय.

नक्की वाचा >> Coronavirus : किम जोंग-उनने दिले दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

उत्तर कोरियामधील नवीन कायद्यानुसार या आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. यामध्ये पायरेटेड पद्धतीने कंटेट पाहणे, बाळगणे आणि प्रसारित करण्यास खास करुन अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील कंटेटची स्मगलींग करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते. यात अगदी मृत्यूदंडापासून ते अटकेपर्यंतच्या शिक्षेचा समावेश आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन आणि त्याच्या कठोर नियमांसाठी हा देश कायमच चर्चेत असतो. तसेच आता हे प्रकरणही चर्चेत आहे.