King Cobra On Door Video : सोशल मीडियावर सध्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ५ फूट लांब विषारी कोब्रा सापाने थेट घराच्या मुख्य दरवाजाच्या कडीवरच रात्रभर ठाण मांडून बसला होता. दारातच फना काढून बसलेल्या या सापाला पाहून कुटुंबाची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
या घटनेमुळे घरात उपस्थित असलेल्या लहान मुलांसह, महिला आणि वृद्धांची भीतीपोटी गाळण उडाली. दरवाजा उघडला गेलो तर थेट मृत्यू समोर उभा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला रात्रभर घरातच जागे रहावे लागले. देवाचा धावा करत या कुटुंबाने मरणाच्या छायेत संपूर्ण रात्र कशी काढली, याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
कोब्रा सतत कडीवरच फन काढून बसून राहिला. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य रात्रभर घरातच अडकून पडले. मनात इतकी भीती होती की, कोणी साप पळवून लावण्याचा किंवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला नाही. कुटुंबाने देवाचा धावा करत कशीबशी रात्र काढली. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ही घटना आहे.
व्हिडीओत पाहू शकता, कुटुंबातील लोक बेडवर बसले आहेत. त्यातील एक व्यक्ती किंग कोब्रा कशाप्रकारे दरवाजाच्या कडीवर बसून आहे हे दाखवतेय.
मोठ्या शर्थीनंतर सापाला पकडले
सकाळ झाल्यानंतरही कोब्रा बराच वेळ तिथेच ठाण मांडून होता. काही वेळाने तो हळूहळू दरवाजावरून खाली उतरला आणि घरात ठेवलेल्या एका टेबलखाली जाऊन लपला. साप खाली उतरताच कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला आणि तातडीने सर्पमित्राला (स्नेक कॅचर) याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने अत्यंत सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. टेबलखाली लपलेल्या कोब्राला बाहेर काढणे सोपे नव्हते. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर त्या सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले आणि दूर जंगलात सोडण्यात आले. साप पकडल्यानंतरच कुटुंबाची भीती दूर झाली.
सोशल मीडियावर घटना व्हायरल
या घटनेची माहिती आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटले आहे की, जर कुटुंबाने घाबरून दरवाजा उघडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. तर दुसरीकडे, या प्राण्याला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडल्याबद्दल लोकांनी सर्पमित्राचे भरभरून कौतुक केले आहे.
