Viral Video Bus Conductor’s Smart Hack to Beat the Heat : सध्या ‘ऑक्टोबर हीट’मुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. घरातून बाहेर पडल्यापासून ते अगदी स्टेशनवर पोहोचेपर्यंत घामाने अक्षरशः अंघोळ झाल्यासारखे वाटते. अशा वेळी ऐनवेळी नको असलेला ऑफिसमधील एसीसुद्धा हवाहवासा वाटू लागतो. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी काही प्रमाणात सोयी मिळतात. पण, रस्त्यावर काम करणारे कामगार, फेरीवाले आणि छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्ती या कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण कसे करत असतील?
तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका बस कंडक्टरने उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. तुम्ही पाहिलं असेल की, अनेकदा स्टेशनबाहेर असणाऱ्या एसी बसचे कंडक्टर बाहेर उभं राहून प्रवाशांना तिकीट देतात. तर व्हायरल व्हिडीओतील बस कंडक्टर सुद्धा उन्हात उभं राहून प्रवाशांना तिकीट देत आहेत. मात्र उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कॅपमध्ये छोटासा पंखा बसवून घेतला आहे.
व्हायरल व्हिडीओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील असून बस कंडक्टरने केलेला हा जुगाड लक्ष वेधून घेतो आहे. कारण – बस कंडक्टरने डोक्यावर घातलेली ही टोपी साधी नसून, त्याला ‘सोलार फॅन विथ कॅप’ असे म्हणतात. ज्यामध्ये कॅपमध्ये एक छोटासा पंखा फिट केलेला असतो, जो तुमचे उन्हाच्या तडाख्यापासून थोडस का होईना संरक्षण करतो. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बस कंडक्टरने काय जुगाड केला व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hassan_sahil2 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘ही काही थट्टेची गोष्ट नाही, तर अशा कडक उन्हात त्यांच्यासारखं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही सुविधा मिळायला हवी’, ‘हवा घेण्यासाठी उन्हात उभ रहावं लागेल काका’, ‘डोरेमॉन काका’, ‘मला या व्हिडीओतील प्रत्येक गोष्ट आवडली’, ‘या सोलार फॅनची सध्या सगळ्यांनाच गरज आहे’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
