कौतुकास्पद: १९६१ पासून रोज वृक्षारोपण करणारा ७२ वर्षांचा तरूण

ओडीसातील ७२ वर्षीय अंतर्ज्यामी साहू यांनी गेल्या ६० वर्षात राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी ३०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

72 year old Antarjyami Sahoo a retired teacher is an environment enthusiast
अंतर्ज्यामी साहू उर्फ गच्छा सर (फोटो: ANI)

ओडीसा येथील नायगड मधील ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपले जीवन वृक्ष लागवड आणि राज्याला हिरवेगार बनवण्यासाठी समर्पित केले आहे. जगात हवामानातील बदलामुळे आणि मानवाकडून होणाऱ्या अति-शोषणामुळे निसर्गाची भयावह अवस्था दिसून येत आहे.  दरम्यान ओडिशाच्या नायगड जिल्ह्यातील किंतिलो गावचे अंतर्ज्यामी साहू उर्फ ​​गच्छा सर (वृक्ष शिक्षक) यांनी गेल्या ६० वर्षात राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी ३०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. साहू यांना ज्या पद्धतीने निसर्गाचं महत्त्व समजलं हे आपल्यालाही समजणे महत्त्वाचे आहे. अंतर्ज्यामी साहू यांच्या कडून प्रेरित होऊन आपणही आजच्या जागतिक निसर्ग संवर्धन दिना निमित्त आपणही झाड लावायला आणि त्याचं संवर्धन करायला सुरुवात करूयात.

कसा होता साहू यांचा प्रवास?

७२ वर्षीय साहू यांचा झाडांसोबतचा प्रवास ते शाळेत ६ वीच्या वर्गात होते तेव्हापासून झाला. त्यांनी तेव्हा गावाजवळ वट रोपांची लागवड करुन सुरुवात केली. ANI शी बोलताना साहू सांगतात “ मी १९६१ पासून झाडे लावत आहे आणि आजही मी पर्यावरण वाचवण्याच्या दिशेने काम करतो. यामुळे मला आनंद होतो.” ते म्हणतात की वृक्ष लावणे ही त्यांची निसर्गाची आवड आणि त्यांच्यासाठीची सेवा आहे. सेवानिवृत्त शालेय शिक्षक, साहू अजूनही विद्यार्थ्यांना ग्रीन कव्हर वाढविण्याच्या महत्त्वाविषयी आणि त्यांना निसर्गाचे संरक्षण करण्याबद्दल शिक्षण देण्यासाठी शाळांना भेट देतात.

सरकारकडून ‘नेचर लव्हर’ पुरस्कार

साहू यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही ओळखले. ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवरून साहू यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ओडिशा सरकारने त्यांना ‘नेचर लव्हर’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. विभागीय वन अधिकारी (नयागड) एचडी धनराज हनुमंत्स यांनी माहिती दिली की वन विभागाने साहूच्या सूचना, सजेशन्स नायगड वनविभागात लागू केल्या आहेत.

“वृक्ष लागवड करणे किंवा आपल्या पर्यावरणविषयक मोहिमेद्वारे इतरांना उत्तेजन मिळावेत यासाठी गच्छा सर आपले १०० टक्के देतात. आम्ही त्यांच्या अनेक सजेशन्स नायगड वनविभागात लागू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली आहे.” असे विभागीय वन अधिकारी ANI शी बोलतांना म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Odishas 72 year old tree teacher plants more than 30000 trees over 60 years ttg