Ola Driver Watching TV While Driving: रस्त्यावर वाहन चालवताना क्षणभराचे दुर्लक्षही जीवावर बेतू शकते, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, काही चालकांकडून सुरक्षिततेच्या नियमांकडे किती गंभीर दुर्लक्ष केले जाते, याचा धक्कादायक अनुभव एका प्रवाशाला आला. नोएडाहून दिल्लीकडे प्रवास करत असताना त्याने पाहिलेले दृश्य पाहून त्याच्याच नव्हे तर सोशल मीडियावरील हजारो लोकांच्या अंगावर काटा आला आहे.
घटनेनुसार, संबंधित प्रवासी आपल्या पत्नी आणि लहान भावासह ओला कॅबने दिल्लीकडे जात होता. बाहेर तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानाची प्रचंड उष्णता होती. कुटुंबासोबतचा हा साधासुधा प्रवास अचानक चिंतेचा विषय ठरला, जेव्हा त्याच्या लक्षात आले की कॅबचालक रस्त्याकडे लक्ष देण्याऐवजी गाडीच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनवर लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहण्यात मग्न आहे.
भरधाव वेगाने धावणारी गाडी, समोरचा महामार्ग आणि त्याच वेळी स्क्रीनवर सुरू असलेला मालिका कार्यक्रम… हे दृश्य पाहून प्रवाशाची धडधड वाढली. कोणतीही दुर्घटना घडू शकते याची त्याला जाणीव झाली, त्यामुळे त्याने अत्यंत नम्रपणे चालकाला स्क्रीन बंद करून वाहन चालवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली.
मात्र यानंतर जे घडले, त्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. प्रवाशाच्या म्हणण्यानुसार चालकाने त्याची विनंती सरळ नाकारली. एवढेच नव्हे तर त्याने उद्धटपणे ‘अडचण असेल तर खाली उतरा’ असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून प्रवासी हादरून गेला. एका बाजूला कुटुंबाची सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला प्रखर उन्हात महामार्गावर उतरावे लागण्याची भीती, अशा कोंडीत तो सापडला.
कुटुंबासोबत असल्यामुळे आणि बाहेरची परिस्थिती अत्यंत कठीण असल्यामुळे त्याने कोणताही वाद न घालता प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा अनुभव त्याच्या मनातून जात नव्हता. प्रवास संपल्यानंतर त्याने संपूर्ण घटना सोशल मीडिया मंच एक्सवर शेअर केली.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, भरउन्हात कुटुंबासह प्रवास करत असताना चालक मालिका पाहत होता. सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केल्यानंतरही त्याने ऐकून घेतले नाही. उलट प्रवाशालाच खाली उतरून जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, ॲप-आधारित कॅब सेवांमध्ये प्रवाशांच्या जीवाची किंमत नेमकी किती आहे?
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. काहींनी अशा प्रकारचे वर्तन केवळ गैरसोयीचे नसून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे असल्याचे नमूद केले; तर अनेकांनी कॅब कंपन्यांनी केवळ रेटिंगवर अवलंबून न राहता चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
पोस्ट व्हायरल
या घटनेमुळे पुन्हा एकदा ॲप-आधारित कॅब सेवांमधील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे का, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
