Scooter Ride Stunt Video Viral: मुलांचं संगोपन करण्यात आईची भूमिका तर महत्त्वाची असतेच, पण तितकीच वडिलांची काळजी देखील महत्त्वाची असते. आई माया देते तर वडील काळजी आणि संघर्षाचा आरसा दाखवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिलांचं प्रेम हे त्यांच्या बोलण्यातून दिसत नसलं तरी कृतीतून वेळोवेळी दिसतं. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रोजच्या आयुष्यातला एक भावनिक क्षण कैद झाला आहे. वडील आणि मुलींमधील बंधनाची व्याख्या सांगणारी जबाबदारी आणि प्रेम अधोरेखित करणारा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमध्ये एक माणूस ट्राफिकमधून स्कूटर चालवत असल्याचे दिसते. समोरून पाहिल्यास लोकांना आश्चर्य वाटू शकतं किंवा निष्काळजीपणा वाटू शकतो. मात्र दुसरा हात या व्यक्तीने त्याच्या मुलीला सावरण्यासाठी मागे धरल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मुलीला मागे बसली असताना झोप अनावर झाली म्हणून वडिलांनी तिला सुरक्षेसाठी हाताचा आधार दिलेला या व्हिडीओत दिसत आहे. मागून येणाऱ्या दुचाकीवरील दुसऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओमध्ये कुठलंही नाट्यमय दृष्य नाही, तर फक्त विश्वास, काळजी आणि बाप-लेकीमधलं नातं भरभरून दिसून येतं.
हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल होत असताना युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “हे वडील सायलेंट वॉरियर आहेत”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “पालकांचे बलिदान अनेकदा व्यक्त न होणारे आणि कल्पने पलिकडचे असते”. काही युजर्सनी कमेंट केली आहे की, “वडिलांची फक्त उपस्थिती सुद्धा मुलांचं संपूर्ण जग कसे बनू शकते याची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे.”
हा व्यक्ती एक सामान्य माणूस दिसत असला तरी या व्हिडीओतून तो खूप मोठा श्रीमंत आहे असेच प्रतित होते. वडिलांच्या प्रेमाची खोल भावना अनेकदा शब्दांमधून व्यक्त केली जात नाहीतर लहान लहान कृतींमधून ती व्यक्त केली जाते. या व्हिडीओतून असंख्य भावना दिसून येत आहेत.

