Oracle Layoffs impact on senior software engineer with high package and 14 years experience : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या अनिश्चिततेचे वातावरण असून, अनेक बड्या कंपन्या कर्मचारी कपात करत असल्याचे दिसून येत आहे. यातच तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी ओरॅकलने देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याचा वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा अनुभव आणि त्यानंतर येणारा मानसिक ताण याबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत.
नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अशीच एक पोस्ट व्हायरल झाली असून, यामध्ये एका नोकरीवरून काढण्यात आलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचा अनुभव सांगण्यात आला आहे. कथितपणे या कर्मचाऱ्याने कंपनीत अनेक वर्षे सेवा दिली होती आणि नुकतेच त्याच्या कामाचे कौतुकही झाले होते. मात्र, असे असूनही, एकेदिवशी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
पोस्टमघ्ये काय म्हटले आहे?
या वापरकर्त्याने लिहिले की, “नुकतेच माझ्या एका मित्राबरोबर फोनवर बोलणे झाले, त्याला काल ओरॅकलमधून काढून टाकले आहे…काल सकाळी हे घडले. कसलाही फोन कॉल नाही, कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. फक्त एचआरचा एक ऑटोमेटेड ईमेल आला.”
या पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, कर्मचारी हा ४८ लाख वार्षिक पगार असणारा एक प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि तो गेली १४ वर्ष या कंपनीत काम करत होता. नुकतेच त्याने आपल्या वृद्ध आई-वडिलांना बंगळुरू आणले होते, आणि स्वत:च्या रहाणीमानावर खर्च देखील वाढवला होता, ज्यामध्ये तो ८५ हजार रुपये इतके घरभाडे भरत होता.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “दोन आठवड्यांपूर्वी, त्याच्या व्हीपीने त्याला उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल स्पॉट बोनस दिला होता. आणि काल सकाळी, ना कोणता फोन कॉल, ना कोणतीही पूर्वसूचना. फक्त एक ऑटोमटेड एचआर ईमेल आला.”
पोस्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या कर्मचाऱ्याला दोन मुले आहेत, एक कॉलेजमध्ये आहे आणि दुसरा जेईईची तयारी करत आहे. या अचानक घडलेल्या घटनांमुळे त्याला चांगलाच धक्का बसला आहे. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “१४ वर्षांची निष्ठा. ४८ लाखांचे वार्षिक पॅकेज एका ईमेलने शून्यावर आले. आणि तरीही ते त्यांच्या जॉब पोस्टिंगमध्ये ‘पिपल फर्स्ट’ असे लिहितात. ढोंगी लोकं.”
कामावरून काढून टाकल्याचा मानसिक आघात देखील मोठा असल्याचे या वापरकर्त्याने अधोरेखित केले. त्याने सांगितले की, आपल्या कुटुंबातील लोकांना ही बातमी कशी द्यावी याचा विचार करत तो कर्मचारी काही मिनिटं शांत बसून राहिला.
या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कर्मचारी कपात ज्या पद्धतीने हाताळली त्या प्रकाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे तसेच अनेकांनी कर्मचाऱ्यांना असे नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली. कंपनीत अनेक वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे निर्णय घेताना तो अत्यंत यांत्रिक पद्धतीने घेतल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
