Oracle Layoffs : सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात एआयचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयमुळे कामाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून अनेक कंपन्या त्यांच्या कामात एआयचा वापर करत आहेत. मात्र, याचा फटका कामगारांवर होत असल्याचं बोललं जात आहे. आता नुकतंच ओरॅकल या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने जगभरातील आपल्या शाखांमधून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली. या नोकरकपातीचा भारतीयांनाही मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.

यामध्ये भारतातील जवळपास ११,००० ते १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचं ओरॅकलने सांगितलं. अशा प्रकारच्या नोकरकपातीमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे. मात्र, यावर मात कशी करायची? याचं एक उत्तम उदाहरण म्हणून एका तरुणाने एक्सवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

एका इंजिनिअरने ओरॅकलमधील आपली नोकरी गमावल्यानंतर तो चक्क उबर चालक बनला आणि या माध्यमातून तो आता दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. याबाबत एक्सवर (ट्विटर) एका युजरने पोस्ट शेअर करत त्याच्या मित्राची ही गोष्ट शेअर करत तरुणांना सल्ला दिला आहे. या युजर्सची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नायक सत्या नावाच्या युजरने काय म्हटलं?

नायक सत्य नावाच्या एका युजरने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “माझ्या एका जवळच्या मित्राला ओरॅकल बंगळूरमधून काढून टाकण्यात आलं. मात्र, तरीही तो घाबरला नाही किंवा त्याने कोणतंही टेन्शन घेतलं नाही. बंगळूरुमधील त्याची नोकरी गेल्यानंतर तो थेट भुवनेश्वरमधील त्याच्या घरी परतला. आता नोकरी गमावल्यानंतर त्याचं पुन्हा गावी परतणं म्हणजे अनेकांना धक्कादायक वाटू शकतं. मात्र, तो आता अनेक नोकरदारांपेक्षा जास्त कमावतो आणि तो रात्री अधिक शांत झोपतो.

या युजरच्या पोस्टनुसार, “या तरुणाच्या दोन संयुक्त खात्यांमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या पोस्टल मुदत ठेवी ठेवल्या होत्या. यामध्ये त्या तरुणाने त्याच्या आई-वडिलांच्या नावावर आणि दुसरे त्याच्या पत्नीच्या नावावर या ठेवी ठेवल्या होत्या. या सर्वांमधून मिळून त्याला दर महिन्याला जवळपास २८ हजार रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळतो. एवढंच नाही तर याशिवाय त्याच्या आणखी ३० लाख रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यामधून त्याला महिन्याला अतिरिक्त १५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे आता आयटीतील नोकरी गेल्यानंतर तो तरुण त्याच्या आई-वडिलांबरोबर निवांत राहत आहे. तसेच नोकरी गेल्यानंतर त्याने लगेचच उबर ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं”, असा दावा या नायक सत्या नावाच्या युजरने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे.

दरम्यान, आपला युजरने यामधून सर्वात मोठा धडा सांगताना म्हटलं की, “मित्रांनो, आधीच नियोजन करा, म्हणजे गरज पडल्यास तुमची कधीही गडबड होणार नाही. माझ्यासाठी सर्वात मोठी शिकवण ही आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी नेहमी हसतमुखाने राहायचं.