Oracle Layoffs Employee Post Viral: जगभरातील आयटी क्षेत्रात सध्या खळबळ उडाली आहे. दिग्गज कंपनी Oracle ने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. मात्र, या कपातीच्या तणावपूर्ण वातावरणात एका महिला कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पोस्ट वाचून लोक हसतही आहेत आणि गंभीरपणे विचारही करत आहेत.

नेमकं काय घडलं?

ओरॅकल (Oracle) कंपनीने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी आणि व्यवसायाच्या नवीन धोरणांशी जुळवून घेण्यासाठी जगभरातून सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरी जाणे हे कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या धक्कादायक असते. मात्र, क्लेअर फोंटेनोट यांनी या परिस्थितीला ज्या सकारात्मकतेने हाताळले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्याची ‘कॅज्युअल’ प्रतिक्रिया

क्लेअर फोंटेनोट या ओरॅकलमध्ये ‘सीनियर टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर’ (प्रोडक्ट डेव्हलपमेंट) या पदावर कार्यरत होत्या. कपातीची बातमी समजताच त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘Yikes’ (बापरे!) अशी होती. पण लगेचच त्यांनी स्वत:ला सावरले आणि एक मजेशीर पोस्ट लिहिली.

“आता मला सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची आणि मनासारखा आराम करण्याची संधी मिळेल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

क्लेअर यांनी कबूल केले की, नोकरी जाणे सोपे नसते आणि नवीन नोकरी शोधणे कठीण असू शकते. मात्र, त्यांनी या वेळेला स्वतःसाठी एक ‘ब्रेक’ म्हणून पाहिले आहे. आयुष्यात असे क्षण खूप कमी येतात जेव्हा माणूस थोडा वेळ थांबून स्वतःच्या भविष्याचा शांतपणे विचार करू शकतो, असे त्यांचे मत आहे.

सकारात्मकतेची सोशल मीडियावर चर्चा

क्लेअर यांच्या या दृष्टिकोनामुळे सोशल मीडिया युजर्स प्रभावित झाले आहेत. संकटाच्या काळात घाबरून न जाता शांत राहिल्यास नवीन संधींची दारे उघडू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

प्रेरणादायी दृष्टिकोन

अनेक युजर्सनी त्यांच्या सकारात्मकतेची प्रशंसा केली आहे. “अशा कठीण प्रसंगात इतका समतोल राखणे प्रत्येकाला जमत नाही,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

असा मिळाला कपातीचा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली त्यांना पहाटे ६ वाजता ई-मेलद्वारे ही माहिती देण्यात आली. कंपनीने स्पष्ट केले की, सध्याच्या गरजांनुसार काही पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भरपाई आणि मदत

ओरॅकलने प्रभावित कर्मचाऱ्यांना ‘सेवरन्स पॅकेज’ (Severance Package) देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये काही आठवड्यांचा मूळ पगार आणि कामाच्या अनुभवाच्या वर्षांनुसार अतिरिक्त मानधन त्यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे नवीन नोकरी मिळेपर्यंत त्यांना आर्थिक आधार मिळेल.