Ostrich Viral Video : महामार्ग सहसा भरधाव वेगाने धावणाऱ्या कार, ट्रक आणि बाइक्सने भरलेले असतात. तेथून वाहने इतक्या वेगाने जात असतात की, तिथून कोण चालत जाण्याची हिंमत करू शकत नाही; पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका महामार्गावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. त्यात चक्क एका शहामृगाने चक्क महामार्ग अडवला होता. महामार्गावर आरामगाडीतून प्रवास करताना अचानक शेजारच्या मार्गिकेमधून धावणारा शहामृग पाहून चालकही चकित झाले.

ही घटना मंगळवारी थायलंडच्या चोनबुरी प्रांतात घडल्याचे समोर येत आहे. येथील एका महामार्गावर बी१ नावाचा सहा महिन्यांचा नर शहामृग एका कॅफेतून पळून महामार्गावर धावत आला. पण, तो शहामृग काही साधारण शहामृगांसारखा नव्हता. त्याची उंचीच सुमारे सहा फूट होती आणि तो खूप चपळदेखील होता. रस्त्यावर येताच तो न थांबता, प्रचंड वेगाने धावू लागला. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग अचानक मंदावला आणि मागील वाहनांना पुढे नेमकं काय झालं ते काहीच समजत नव्हते.

वाहनांच्या मधून अतिशय वेगाने धावतोय शहामृग

महामार्गावरील वाहनचालकांसाठी हे दृश्य खरोखरच चकित करणारे होते. पुढे अपघात झाला असावा आणि त्यामुळे वाहतूक मंदावली असावी, असे वाटून काही चालक सुरुवातीला घाबरले; पण जसजसे ते पुढे जात होते, तसतसे त्यांना काहीतरी वेगळेच दिसले. एक शहामृग वाहनांच्या मधून अतिशय वेगाने धावत होते, जणू काही त्याची शर्यतच लागली होती.

यावेळी ३३ वर्षीय चैरत सोमपोंग त्याच रस्त्यावरून जात होता. त्याने सांगितले की, पुढे झालेली वाहतूक कोंडी पाहून त्याला वाटले की, नक्कीच मोठा अपघात झाला असावा; पण जेव्हा तो जवळ गेला, तेव्हा रस्त्यावरून धावणाऱ्या शहामृगाला पाहून तो चकित झाला. ते दृश्य इतके विलक्षण होते की, त्याला हसू आवरता येत नव्हते.

चैरतने लगेच आपला मोबाईल बाहेर काढला आणि संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू केले. चित्रीकरण करीत असताना तो गमतीने म्हणाला, “ए, हा रस्त्यावर फिरणारा शहामृग कोणाचा आहे? त्याला लवकर पकडा, तो खूप वेगानं पळत आहे.” त्याच्या आवाजातील गंमत आणि विनोद दोन्ही स्पष्ट ऐकू येतेय.

चालकाने हुशारीने हाताळली परिस्थिती

चैरतने परिस्थिती हुशारीने हाताळली. त्याने काळजीपूर्वक आपले वाहन असे काही वळवले की, शहामृग रस्त्याच्या कडेला गेला. अखेरीस, तो डाव्या मार्गिकेमध्ये गेला आणि तिथे थांबला. त्यामुळे एक संभाव्य धोका टळला. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा शहामृग रस्त्यावर पोहोचलाच कसा? बी१ पट्टायामधील एका अॅनिमल थीमवर आधारित कॅफेमध्ये राहतो, जिथे तो त्याच्या सोबती बी२ बरोबर राहतो. कॅफेचे मालक इतासारा बोरिबून यांनी या घटनेमागील कारण स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले की, त्या दिवशी कॅफेमध्ये बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी एक ट्रक आला होता. ट्रकच्या मोठ्या आवाजामुळे शहामृग घाबरला.

घाबरलेल्या बी१ शहामृगाने कॅफेचे कुंपण ओलांडून पलायन केले. घाबरलेला शहामृग धावत धावत थेट महामार्गावर पोहोचला; पण तिथेही न थांबता तो पूर्ण ताकदीने धावत राहिला. अशा प्रकारे तो सुमारे १५ किलोमीटरपर्यंत धावत राहिला.

कॅफेच्या मालकाने सांगितले की, त्याने हा शहामृग सुमारे पाच महिन्यांपूर्वी विकत घेतला होता. त्याची किंमत अंदाजे १५,००० भाट म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे ३८,००० रुपये होती. हा शहामृग त्याच्या कॅफेमधील एक विशेष आकर्षण असल्यामुळे त्याच्या पळून जाण्याने मालक खूप अस्वस्थ झाला होता.