Pakistan Luxury Train Video : सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण सध्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानातील ‘सर्वांत आलिशान’ (Luxury Train) मानल्या जाणाऱ्या रेल्वेचा. पाकिस्तानकडून या ट्रेनचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी हा व्हिडीओ पाहून युजर्सना मात्र हसू अनावर झालं आहे. विशेषतः भारतीय युजर्सनी या ट्रेनची तुलना चक्क भारतातील जनरल डब्यांशी आणि मुंबई लोकलशी करायला सुरुवात केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनच्या आतील भाग दाखवण्यात आला आहे. त्यात काही प्रमाणात स्वच्छ सीट्स, एसी कोच आणि शांततापूर्ण वातावरण दिसून येत आहे. या व्हिडीओनुसार, या लक्झरी ट्रेनचे भाडे सुमारे ९,९०० रुपये आहे. मात्र, व्हिडीओ समोर येताच युजर्सनी पाकिस्तानची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

अनेकांनी कमेंट्स केली की, जर ही तिथली लक्झरी ट्रेन अशी असेल, तर पॅसेंजर ट्रेनची काय वाईट अवस्था असेल. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओवर पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीची आणि तेथील रेल्वे व्यवस्थेची खिल्ली उडविणाऱ्या हजारो कमेंट्स करण्यात आल्या आहेत..

व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये युजर्स भारत आणि पाकिस्तानच्या रेल्वे सिस्टीमची तुलना करीत आहेत. अनेक भारतीय युजर्सनी कमेंट केल्या की, भारत कमी किमतीत चांगल्या सुविधा देतो. काहींनी भारताच्या वंदे भारत या ट्रेनचे उदाहरण देत म्हटलं की, येथील आलिशान प्रवासासाठी सुमारे २,००० रुपये लागतात; तर पाकिस्तानात एका साध्या दिसणाऱ्या ट्रेनसाठी ९,९०० रुपये लागतात.

एका युजरनं तर उपरोधिकपणे म्हटलं, “आमच्या मुंबई लोकलचे डबेही यापेक्षा अधिक हाय-टेक आणि स्वच्छ असतात!” तर दुसऱ्यानं लिहिलं, “भारतात अशा सुविधा पॅसेंजर ट्रेनमध्येही सहज मिळतात.” तिसऱ्या एका युजरनं लिहिलं, “भारतात याला थर्ड एसी म्हणतात.” लोकांनी निदर्शनास आणून दिले की, भारताची रेल्वे बरीच आधुनिक झाली आहे, तर पाकिस्तान अजूनही बेसिक सुविधा असलेली ट्रेन लक्झरी म्हणून दाखवतो.

“आमच्या मुंबई लोकलचे डबेही यापेक्षा अधिक हाय-टेक” यूजर्सच्या कमेंट्स

या व्हायरल व्हिडीओनंतर अनेक युजर्सनी पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, ज्या देशात महागाई, बेरोजगारी व गरिबी इतकी फोफावली आहे, तिथे अशा ट्रेनला एक चैनीची वस्तू म्हणून दाखवणं चुकीचं नाही.