Pakistan Financial Crisis: मागील काही वर्षात पाकिस्तानची आर्थिक स्थिती पुरेपूर ढासळली आहे. नेहमीच्या वापराच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. या आर्थिक अडचणीमुळे राजकीय व सामाजिक अस्थिरताही निर्माण झाली आहे. यावर पुन्हा अतिपावसामुळे आलेलं पुराचं संकट तसेच करोनाचा अजूनही कायम असणारा प्रभाव यामुळे पाकिस्तान सरकारची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. अशातच आता पाकिस्तानाने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कुत्रे व गाढवांचा आधार घ्यायचे ठरवले आहे. कुत्रे व गाढवाच्या मदतीने आर्थिक स्थैर्य आणण्याचा पाकिस्तानचा प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊयात..

पाकिस्तानला पैसे कमावण्यासाठी चीनकडून एक अत्यंत हटके प्रस्ताव देण्यात आला आहे, जियो न्यूजच्या हवाल्याने समोर आल्या वृत्तानुसार चीनने पाकिस्तानकडून कुत्रे व गाढवे विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोमवारी, पाकिस्तानाच्या व्यवसाय मंत्रालयात स्थायी समितीच्या अधिकाऱ्यांसमोर आयात व निर्यातीवर चर्चा करण्यात आली. संसदीय समितीचे सदस्य दिनेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे चीनने पाकिस्तानकडून गाढव व कुत्रे आयात करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे.

सीनेटर अब्दुल कादिर यांनी समितीला सांगितले की, चीनचे राजदूत अनेकदा पाकिस्तानातून मांस निर्यात करण्यासाठी इच्छा व्यक्त करतात. इतकेच नव्हे तर सिनेट सदस्यांनी अफगाणिस्तानातून स्वस्तात मांस विकत घेऊन पाकिस्तानने चीनला विकावे असेही पर्याय सुचवले आहेत. तूर्तास लंपी व्हायरसच्या प्रसाराने पाकिस्तानने अफगाणिस्तानातून आयात थांबवली आहे.

चीनला का हवेत पाकिस्तानचे गाढव?

एका अहवालानुसार चीनला पाकिस्तानकडून गाढव खरेदी करण्यात रस आहे. मुळात गाढवाच्या त्वचेत अनेक औषधी गुण असतात ज्याचा वापर पारंपरिक चीनी औषधांमध्ये जिलेटीन निर्माण करण्यात केला जातो. असं म्हणतात या औषधांमुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जगभरात गाढवांची अधिक संख्या असणाऱ्या देशात पाकिस्तानाचा क्रमांक तिसरा आहे. २०२१-२२ च्या गणनेनुसार पाकिस्तानात तब्बल ५. ७ मिलियन म्हणजेच ५७ लाख गाढवं आहेत, चीन यापूर्वी सुद्धा पाकिस्तानातून प्राणी विकत घेत होता.

पाकिस्तानातील आर्थिक संकटात आधार म्हणून मागील वर्षी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने ३ हजार एकरात गाढवांचे कुरणक्षेत्र साकारले होते. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या माहितीनुसार पाकिस्तानावावर एकूण ५९.७ ट्रिलियन (पाकिस्तानी) रुपयांचे कर्ज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के अधिक आहे.