पाकिस्तानमध्ये केवळ एक लॅपटॉपमुळे एका चॅनलच्या तब्बल १७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची घटना समोर आली आहे. त्यांची चूक फक्त इतकीच होती की ते पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोर भेटीचे कव्हरेज प्रसारित करू शकले नाहीत. कव्हरेज करू न शकण्याचे कारण म्हणजे त्या काळात हायटेक लॅपटॉप नव्हते.

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, जुन्या सरकारमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात बड्या चेहऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अभियंते, कॅमेरामन, कार्यक्रम व्यवस्थापक आणि अनेक व्हिडीओ निर्माते यांचा समावेश आहे.

डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांनी २४ एप्रिल रोजी लाहोरच्या कोट लखपत तुरुंग आणि रमजान बाजारला भेट दिली. सरकारी चॅनल पीटीव्लाही या दौऱ्याची माहिती अगोदरच देण्यात आली होती, यावेळी त्यांच्याकडे हायटेक लॅपटॉप नसल्याने ते पंतप्रधानांच्या भेटीचा व्हिडीओ अपलोड करू शकले नाहीत.

प्रोटोकॉलनुसार, एक रिपोर्टर आणि निर्मात्याची व्हीव्हीआयपी टीम पंतप्रधानांच्या कव्हरेजसाठी जबाबदार असतात. त्यांच्याकडे ब्रॉडकास्टिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी नवनवीन गॅझेट्स असतात. ते पंतप्रधानांच्या देश-विदेश दौऱ्यावर त्यांच्यासोबत असतात. कोअर टीम इस्लामाबादमधून कव्हरेज मॅनेज करतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

खाजगी विक्रेत्याकडून लॅपटॉप भाड्याने घेतले
पीटीव्ही लाहोरला पंतप्रधानांच्या भेटीची माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी इस्लामाबाद मुख्यालयाला सांगितले की त्यांच्याकडे हायटेक लॅपटॉप नाही. १८ एप्रिल रोजी, पीटीव्ही लाहोरने मुख्यालयाला सांगितले की त्यांनी टूर कव्हर करण्यासाठी एका खाजगी विक्रेत्याकडून लॅपटॉप भाड्याने घेतला आहे. तसंच सूत्रांनी डॉनला आणखी एक माहिती दिली आहे. यामध्ये लाहोर टीमने व्हीव्हीआयपी टीमला कव्हरेजसाठी वैयक्तिक लॅपटॉप दिल्याचे सांगितलं जात आहे. कव्हरेजनंतर जेव्हा टीमने व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लॅपटॉपची बॅटरी संपली होती. यानंतर शरीफ यांच्या दौऱ्याच्या व्हिज्युअलशिवाय ऑडिओच्या मदतीने बातम्या चालवाव्या लागल्या.

दुसऱ्याच दिवशी, २५ एप्रिल रोजी, PTV ने VVIP कव्हरेजचे उपनियंत्रक इम्रान बशीर खान यांना निलंबित केले. अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी मोठ्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत होतं, मात्र यावेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, कार्यवाह कार्यक्रम व्यवस्थापक कैसर शरीफ यांची लाहोर केंद्राच्या महाव्यवस्थापकावरून बदली करून सैफुद्दीन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. चालू घडामोडी कव्हर करणारे निर्माता सोहेल अहमद यांच्या जागी इश्तियाक अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.