Pakistan Muslim Artist Ganpati Murti Paint news: गणेशोत्सव जवळ आला असून महाराष्ट्रासह देश आणि जगभरात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे, तिथे गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या मराठी माणसाकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीही गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदाची गणेशमूर्ती एका मुस्लीम कलाकाराने रंगवली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर द अमर प्रकाश या आयडीवरून सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २० लाख व्ह्यूज मिळाले असून दीड लाख लोकांनी लाईक्स आणि अडीच हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत. पाकिस्तानसारख्या मुस्लीम बहुल देशात एक महाराष्ट्रीयन कुटुंब अभिमानाने गणेशोत्सव साजरा करत असून मुस्लीम धर्मीयही त्यांच्या आनंदात सामील होत असल्याचे चित्र अमर प्रकाश यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून दिसत आहे.

अमर प्रकाश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुस्लीम कलाकार गणपतीच्या मूर्तीचे रंगकाम करताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कराचीमधील मराठी कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या गणेश मठ मंदिरात एक मुस्लीम कलाकार गणपतीच्या मूर्तीचे रंगकाम करत आहे.”

कोण हिंदू? कोण मुस्लीम?

व्हिडीओच्या सुरुवातीला पांढऱ्या रंगातील गणपतीची मूर्ती दिसते. मुस्लीम कलाकार स्प्रे पेंट देतो. त्यानंतर मूर्तीच्या आभूषणांमध्ये बारीक ब्रशने हळूवार रंग भरतो. रंगकाम जसे जसे पुढे जाते, तशी गणपती बाप्पाची मूर्ती अधिक मनमोहक दिसते. मूर्तीचे पूर्ण रंगकाम केल्याची धावती झलक काही सेकंदाच्या व्हिडीओत दाखवली गेली आहे. व्हिडीओवर कोण हिंदू? कोण मुस्लीम? असा टेक्स्ट देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ:

पाकिस्तानात मराठी संस्कृती जपणारे अमर प्रकाश

अमर प्रकाश यांच्या इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आलेले आहेत. २०२५ च्या गणेश आगमन आणि विसर्जनाचेही व्हिडीओ त्यांनी शेअर केलेले आहेत. गणेश आगमनाच्या व्हिडीओला तीन कोटींहून अधिक व्ह्यूज तर तेवढ्याच लाईक्स मिळालेल्या आहेत. तर गणेश विसर्जनाच्या व्हिडीओला जवळपास एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अमर प्रकाश यांच्या कुटुंबासह इतर हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोकही नाचून आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत.

अमर प्रकाश यांच्या व्हिडीओमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानी मराठा असा उल्लेख आढळतो. गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांचे अनेक व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत. तर आपल्या कुटुंबीयांसह त्यांनी भारतीय पोशाखातही नृत्य आणि गाण्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर ६५ हजार फॉलोअर्स असलेल्या अमर प्रकाश यांनी मराठी संस्कृती जपणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.