लाईव्ह शो किंवा बातम्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात अनेकदा शोमधील पाहुणे एखाद्या गोष्टीवरून रागावतात, भांडण सुरू करतात, काही वेळा तर लाईव्ह शो सोडून निघून जातात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानातील एका लाईव्ह शोमध्ये घडला आहे. टीव्हीवरील एका लाईव्ह कार्यक्रमात पाकिस्तानी गायिका शाझिया मंजूर हिने रागाच्या भरात असे काही केले, जे पाहून अनेक जण अवाक् झाले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कॉमेडियन शेरी नन्हा याने केलेल्या एका विनोदावरून ती इतकी भडकली की तिचा संयम सुटला.
एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हास्य विनोद सुरू होते. याचवेळी कॉमेडियन शेरी नन्हा याने गमतीने गायिका शाझिया हिला हनिमूनशी संबंधित काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ती खूप भडकली आणि तिने रागाच्या भरात शेरीला एकापाठोपाठ एक कानाखाली मारण्यास सुरुवात केली. तिथे बसलेल्या बाकीच्या लोकांनाही हसता-खेळता हा संवाद भांडण आणि मारामारीपर्यंत कधी पोहोचला ते समजलंच नाही.
पाकिस्तानच्या लोकप्रिय वृत्तवाहिनी पब्लिक न्यूजवर प्रसारित होणारा टॉक शो तेथील लोक आवडीने पाहतात. या आठवड्यात गायिका शाझिया मंजूर ही शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून आली होती, तर कॉमेडियन शेरी नन्हादेखील या शोचा एक भाग होता.
यावेळी शेरी नन्हा शाझिया मंजूरला लाईव्ह शोदरम्यान म्हणतो की, ‘आम्ही लग्न केले तर मी लगेच तुम्हाला हनिमूनसाठी मॉन्टे कार्लोला घेऊन जाईन. तुम्हाला कोणत्या क्लासमधून जायला आवडेल मला सांगता का? हे ऐकून शाझिया मंजूर भडकते आणि लाईव्ह शोमध्येच ती शेरी नन्हाला शिवीगाळ करू लागते. गायिका रागारागात तिच्या जागेवरून उठते आणि त्याच्या दिशेने जात म्हणते, ‘ पहिली गोष्ट म्हणजे तू थर्ड क्लास आणि निर्लज्ज माणूस आहेस. गेल्यावेळीपण मी म्हणाले होते, पण सगळ्यांना ती गोष्ट खोटी वाटली होती, आठवतं का, की मी आधीपण म्हटलं होतं, तो हनिमूनबद्दल बोलतोय, तुला लाज वाटत नाही का कुणाबरोबर असं बोलायला?’ याचवेळी रागाच्या भरात शाझिया त्याच्या एकामागोमाग एक सणसणीत कानाखाली वाजवते.
यावेळी शोचा होस्ट मोहसीन अब्बास हैदर हे भांडण सोडवण्यासाठी म्हणून मध्यस्ती करतो. मात्र, शाझिया मंजूर त्याला थांबवते आणि पुन्हा रागारागात म्हणते, ‘आज कोणी पुढे यायचं नाही, तुझा हनिमूनबद्दल विचारण्यामागचा अर्थ काय आहे?’ कोणत्याही महिलेबरोबर हनिमूनबद्दल बोलणे असा. मागच्या वेळीही तू म्हणाला होतास की, हा प्रँक आहे. मी देखील सर्वांना सांगितले की, ही एक प्रँक आहे, गेल्या वेळीही त्याने असेच गैरवर्तन केले होते हे लोकांना माहीत नव्हते. मी त्याला बरोबर खडसावले होते.
हे सर्व ऐकल्यानंतर मध्यस्ती करणाऱ्या मोहसीन अब्बास हैदर यानेही शेरी नन्हावर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाला की, ‘शेरी, तू तुझ्या मनाच्या लाईन्स बोलू नकोस; भावा, स्क्रिप्टमध्ये जे लिहिले आहे तेच बोल.’ यानंतर शाझिया मंजूर शेरीला पुन्हा धक्काबुक्की करते. यावेळी उपस्थित लोक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्स व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.