Pandharpur Wari Shocking Video : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. मोठ्या भक्तीमय वातावरणात वारकरी तहान भूक, जात-धर्म विसरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीस दाखल होतात. वारीचा हा संपूर्ण सोहळा नयनरम्य असल्यामुळे अनेकांना एकदा तरी वारीचं सुख, चैतन्य अनुभवण्याची इच्छा असते. तर अनेक जण वर्षानुवर्ष वारी अनुभवताना दिसतात. या वारीत एकप्रकारची शिस्त, सेवाभाव आणि प्रेमभावना दिसून येते, पण याच वारीत एका वारकरी महिलेबरोबर एक धक्कादायक घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील घटनेचा हा व्हिडीओ आहे, ज्यात चोपदार हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत महिला वारकऱ्याशी अतिशय उद्धट वर्तन करताना दिसला.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान करून उघडेवाडी या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी माऊलींचे पारंपरिक उभे रिंगण पार पडत होते. यावेळी काही वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन भक्तिभावाने रिंगण सोहळ्यात प्रदक्षिणा घेण्याचा आनंद घेत होत्या. यावेळी एक वारकरी महिला रिंगणाच्या मार्गात आली, तेव्हा चोपदाराने गर्दीतून पुढे येत त्या महिलेला मागून धक्का देत जोरात ढकलून दिलं, यामुळे त्या वारकरी महिलेचा तोल जाऊन ती थेट समोर बसलेल्या इतर वारकऱ्यांवर जाऊन पडली.
धक्कादायक बाब म्हणजे वारकरी महिलेने डोक्यावर पितळेची जड तुळस घेतली होती, जी पडली असती तर तिला किंवा समोर बसलेल्या वारकऱ्यांना दुखापत झाली असती. इतक्यावरच ते थांबले नाहीत, चोपदार तिच्यावर ओरडून म्हणतोय की, तुला ऐकायला येत नाही? यावर ती महिला काय झालं एवढं असं उत्तर देते. यानंतर चोपदाराबरोबरचे लोकही महिलेवर ओरडण्यासाठी पुढे येतात. याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे महिला पडली त्या ठिकाणी पोलिसही बसले होते, पण त्यांनीही चोपदाराला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वारीतील चोपदाऱ्याच्या अरेरावी, मुजोरीचा हा व्हिडीओ @kavi_manacha_patrakar_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, अरे हा कोण महाराज आहे, असा परमार्थ करतो का? ज्या माता माऊलीच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आहे, तू त्या माऊलीला ढकलून देतोयस, कळायला पाहिजे ना थोडेतरी. दुसऱ्या एकाने लिहिले की, जिथे मायलेकाची इज्जत नाही तिथे भक्ती काय कामी येत नाही. किती वारी करा जिथे म्हाताऱ्यांना सन्मान नाही तिथे पांडुरंग तुम्हाला कधीच दिसणार नाही? तिसऱ्या एकाने लिहिले की, माऊली सेवा करून परमार्थ करा, दिखावा करून सेवा होत नाही महाराज.
दरम्यान, अनेक जण हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. काही जण या चोपदारावर कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण माफी मागण्याची मागणी करत आहेत.