‘बेटी धन की पेटी’ असं बोललं जातं. मात्र याची प्रचिती आली ती भोपाळमध्ये…घरात मुलगी जन्माला आली म्हणून आनंदापोटी एका पाणीपुरीवाल्याने चक्क ५० हजार रूपयांची पाणीपुरी अगदी मोफत वाटली. “ती’चे आगमन होताच या पाणीपुरीवाल्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि अतिशय दिमाखदार पद्धतीनं मुलीच्या जन्माला सोहळा साजरा केला. यामुळं बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना संदेश मिळाला असून, सामाजिक बदलाला चालना मिळतेय. पाणीपुरीवाल्याचं घरी हा अनोखा सोहळा पाहून सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली.

भोपाळमधल्या कोलार रोड इथे राहणाऱ्या अंचल गुप्ता या पाणीपुरीवाल्याच्या घरी १७ ऑगस्ट रोजी मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानाचा आनंद या पाणीपुरीवाल्याने गावकऱ्यांसह अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोलार भागातील लोकांना ५० हजार पाणीपुरी मोफत वाटली. यासाठी त्याने कुठलीच कसर ठेवली नाही. एकूण १० स्टॉल पाच तासापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. मुलीचा बाप बनलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या अनोख्या उत्सवात लोकांनीही पाणीपुरी खाण्यासाठी भलीमोठी रांग लावली होती. हा आनंद या एकट्या कुटुंबाने नव्हे, तर अख्ख्या गावाने साजरा केला.

घरात जन्मलेल्या मुलीचं नाव सुद्धा या पाणीपुरीवाल्याने ‘अनोखी’ असं ठेवलंय. त्याला दोन वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. जर मुलगी झाली तर मोठ्या धुमधडाक्यात जन्माचा उत्सव साजरा करायचा हे, त्याने आधीच ठरवलं होतं. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ६ या वेळेत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना त्याने मोफत पाणीपुरी देण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त लोकांना मोफत पाणीपुरी खाता यावी यासाठी 10 स्टॉल लावण्यात आले. या संपूर्ण सोहळ्यात त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला साथ दिली. पाच तासांमध्ये त्याने लोकांना ५० हजार पाणीपुरी खाऊ घातली. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली होती. दुकानाबाहेर तंबू उभारला होता.

आणखी वाचा : लाडक्या गणरायासमोर एसीपीही बेभान होऊन नाचतात तेव्हा…; व्हिडीओ व्हायरल!

आणखी वाचा : हत्तीने गणपती मंदिरात येऊन बाप्पाची पूजा केली! व्हिडीओ होतोय व्हायरल

देवाकडे मुलगीच मागितली होती

अंचल गुप्ता याने लग्नानंतर आपल्याला मुलगीच व्हावी अशी इच्छा देवासमोर ठेवली होती. पहिला मुलगा झाला, पण दोन वर्षांनी मुलीच्या रडण्याचा आवाज घरात गुंजला. अखेर देवाने त्याची ही इच्छा ऐकली म्हणून त्याने हा आनंद सर्वांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या १४ वर्षांपासून पाणीपुरीचा व्यवसाय करतोय

भोपाळमधला कोलार रोडमध्ये राहणारा अंचल गुप्ता हा मूळचा रायसेनमधल्या देवरीचा आहे. कोलारमध्ये गेल्या १४ वर्षांपासून तो लोकांना पाणीपुरी खाऊ घालतोय. साधारण दिवसात सुमारे ५ हजार पाणीपुरी विकल्या जातात. नेहमी लोक त्याच्या पाणीपुरीची स्तुती करत असतात. मुलीच्या जन्माचा आनंद त्याच्या ग्राहकांसह आणि लोकांसह वाटल्याने त्याचा हा आनंद आणकी दुप्पटीने वाढल्याची भावना त्याने व्यक्त केली.